पक्क्या माहितीवरून छापा टाकला; कच्च्या घरातला डाव उधळला! ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त
By देवेंद्र पाठक | Published: December 11, 2023 04:48 PM2023-12-11T16:48:10+5:302023-12-11T16:48:45+5:30
जुगार खेळणाऱ्या ९ जणांकडून ६२ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्या विरोधात रात्री गुन्हा दाखल झाला.
धुळे : एका कच्च्या घरात छापा टाकून निजामपूर पोलिसांनी रंगलेला पत्त्यांचा डाव उद्ध्वस्त केला. ही कारवाई साक्री तालुक्यातील छडवेल शिवारात रविवारी सायंकाळी करण्यात आली. जुगार खेळणाऱ्या ९ जणांकडून ६२ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्या विरोधात रात्री गुन्हा दाखल झाला.
साक्री तालुक्यातील छडवेल शिवारातील आमखेल रस्त्यावरील एस.के. बीअर बार समोर असलेल्या एका कच्च्या घरात काही जण जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती निजामपूर पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने जुगार खेळत असलेल्या कच्च्या घरात रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास छापा टाकण्यात आला. त्यावेळी पत्त्यांचा जुगार खेळला जात होता. पोलिसांना पाहताच पळापळ सुरू झाली. पण, चारही बाजूंनी पोलिसांनी छापा टाकल्यामुळे कोणालाही पळता आले नाही.
यावेळी घनश्याम चंद्रशेखर बेडसे (वय ४८), दिनेश दिलीप बेडसे (वय ३५), कमलेश रमेश देसले (वय २९), हेमराज नवल बेडसे (वय ४६), सागर प्रकाश कोळी (वय २८), समाधान निंबा सपकाळ (वय ४०), प्रवीण गोरख आहिराव (वय ४६), प्रल्हाद वामन भामरे (वय ४९), कृष्णा सुभाष सोनार (वय ३३, सर्व रा. छडवेल कोर्डे, ता. साक्री) यांच्या विरोधात निजामपूर पाेलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी सुनील अरुण अहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कायदा कलम ४ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.