दुर्बलांसाठी ‘आयुष्यमान’ ठरतेय नवसंजीवनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 07:41 PM2019-06-23T19:41:51+5:302019-06-23T19:45:27+5:30
११ रूग्णालयांद्वारे सेवा । जिल्ह्यात दोन लाख नोंदणीकृत कुटुंबाना मिळाला लाभ
चंद्रकांत सोनार ।
धुळे : जिल्ह्यातील दोन लाख कुटुंबांवर आयुष्यमान भारत योजनेंतर्गत आतापर्यंत ५ लाख खर्चापर्र्यंत मोफत वैद्यकीय उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दुर्बलांसाठी ही योजना नवसंजीवनी देणारी ठरली आहे़
आरोग्य क्षेत्रात रूग्णांना महागड्या उपचारासाठी स्वत:चे पैसे खर्च करावे लागतात़ गरीब रूग्णांना निशुल्क गुणात्मक वैद्यकीय सेवा मिळावी या उद्देशाने सामाजिक, आर्थिक, जातनिहाय सर्वेक्षणानुसार केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत व जन आरोग्य योजनेचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात येत आहे़
३० हजार कुटुंबांना ई-कार्ड
लाभार्थी यादीमध्ये समाविष्ट असलेल्या प्रत्येक कुटुंबास प्रतिवर्ष रुपये पाच लाख आरोग्य विमा संरक्षण दिले जाणार आहे. सदर योजनेमधील पात्र लाभार्थ्यांना देशभरात कोणत्याही रुग्णालयात रुपये पाच लाखांपर्यंत विनामूल्य शस्त्रक्रिया व उपचाराच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे. जिल्हातील ११ रूग्णालयांचा या योजनेसाठी समाविष्ठ करण्यात आले असुन जिल्ह्यातील ३० हजार १८८ लाभार्थ्यांना या योजनेचे ई-कार्डचे वाटप करण्यात आले आहे़
११ रूग्णालयांचा समावेश
भाऊसाहेब हिरे वैद्यकीय विद्यालय, जवाहर मेडिकल कॉलेज, विर्घहर्ता रूग्णालय , इन्स्टिट्यूट आॅफ युरोलोजी साक्रीरोड, सेवा हॉस्पिटल, सिध्देश्वर, सुधा हॉस्पिटल, देवरे हॉस्पिटल, निरामय हॉस्पिटल, ओम हॉस्पिटल, इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल समावेश आहे़
९९५८ रूग्णांवर झाले उपचार
आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत १३ जुन २०१९ पर्यत जिल्ह्यातील ९ हजार ९५८ रूग्णांवर जनआरोग्य योजनेत उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे़ शासनाचा एकूण २२.२७ कोटी एवढा खर्च झाला आहे़
१३०० आजारांवर उपचार
आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतून रूग्णांवर १३०० आजारांवर उपचार केले जातात़ त्यासाठी प्रतिकुटूंब ५ लाखाच्या रकमेचे मोफत उपचार केला जातो़ तर केसरी किंवा पिवळे रेशनकार्ड धारकांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेत ९७१ आजारामध्ये १.५ लाख रूपयापर्यत मोफत उपचार केले जातात़ योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आला आहे़