निजामपूर पोलिसांनी पकडला दीड लाखांचा गुटखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 05:56 PM2019-08-30T17:56:32+5:302019-08-30T18:02:06+5:30
आमखेल रोडवरील कारवाई : एकाविरुध्द गुन्हा दाखल
धुळे : साक्री तालुक्यातील आमखेल रोडवर निजामपूर पोलिसांनी छापा टाकत १ लाख ४७ हजार ७३० रुपयांचा गुटखा जप्त केला़ याप्रकरणी सटाणा तालुक्यातील जायखेडा येथील एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला़ ही कारवाई १४ आॅगस्ट रोजी दुपारी झाली आहे़
साक्री तालुक्यातील छडवेल नजिक आमखेल रोडवर एका वाहनात गुटखा असल्याची गोपनीय माहिती निजामपूर पोलिसांना मिळाली़ माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने छडवेल शिवारात धाव घेतली़ मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सोमा स्लीप कंपनीच्या टॉवरजवळ एमएच ४१ एयू ०४२२ क्रमांकाचे पीकअप वाहन आढळून आले़ या वाहनाची तपासणी केली असता त्यात विमल पान मसाला, तंबाखूच्या पॅकेट आढळून आल्या आहेत़ पोलिसांनी तात्काळ पीक अप वाहन जप्त करत वाहनासह गुटखाचा १ लाख ४७ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे़
ही कारवाई १४ आॅगस्ट रोजी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास करण्यात आली होती़ या प्रकरणी मात्र २९ आॅगस्ट रोजी रात्री १० वाजता पीकअप वाहन चालक दीपक भगवान देवरे (४३, रा जायखेडा ता़ सटाणा जि़ नाशिक) या वाहनचालकाविरुध्द अन्न सुरक्षा व माणके कायदा २००६ नुसार निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला़ सहायक पोलीस निरीक्षक सचिन शिरसाठ घटनेचा तपास करीत आहेत़