भंगार साहित्याचे ‘रेकॉर्ड’च नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2017 12:55 AM2017-01-24T00:55:10+5:302017-01-24T00:55:10+5:30
महापालिका : पाणीपुरवठा विभागातील भंगार साहित्याचा 12 वर्षापूर्वी अखेरचा लिलाव
धुळे : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून 2004 पासूनच्या भंगार साहित्याचा लिलाव झाला नसल्याचे समोर आले असून भंगार साहित्यात कोटय़वधींच्या भ्रष्टाचाराचा संशय निर्माण होत आह़े पाणीपुरवठा विभागाकडून दरवर्षी गळत्यांच्या दुरुस्तीवर कोटय़वधी रुपयांचा खर्च होत असला तरी जुन्या साहित्याचे कुठलेही ‘रेकॉर्ड’ मनपा प्रशासनाकडे उपलब्ध नाही़ त्यामुळे याप्रकरणी चौकशी होणे आवश्यक आह़े
धुळे महापालिकेत वेगवेगळ्या भ्रष्टाचारांमुळे काळा इतिहास असून त्यामुळे मनपाचा कारभार शहरात नेहमीच चर्चेचा विषय असतो़ 2011-12 मध्ये वसुली विभागात झालेल्या जळीतकांडामुळे महापालिकेचे नाव देशभरात गाजले आह़े त्यानंतरही महापालिकेच्या कारभारात विशेष सुधारणा झालेली नाही़ सातत्याने भ्रष्टाचाराची लहान-मोठी प्रकरणे समोर आली असून त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आले आह़े शहरात पाणी वितरणाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आह़े तापी योजनेच्या जीर्ण जलवाहिनीवरून शहराला पाणीपुरवठा करताना मनपाची दमछाक होत असल्याचे भासविले जात़े त्यामुळे शहरातील जनतेला दरवर्षी पाण्यासाठी वणवण करावी लागत़े शहराला पाणीपुरवठा करणा:या जलवाहिन्यांना सातत्याने लागणा:या गळत्यांची पाणीपुरवठा विभागाकडून दुरुस्ती केली जात़े त्यावेळी निघणारे जीर्ण व भंगार साहित्य संकलित होणे आवश्यक आह़े मात्र महापालिकेत 2004 साली अखेरचा भंगार साहित्याचा लिलाव झाला असून त्यानंतर लिलाव करण्यात आलेला नाही़ त्यामुळे कोटय़वधी रुपयांचे भंगार साहित्य गेले कुठे? असा प्रश्न उपस्थित झाला आह़े मनपाच्या विविध विभागातील जुनाट, वापरात नसलेले भंगार साहित्य स्टोअर विभागात जमा करणे आवश्यक आह़े या साहित्याचा स्टोअर विभागाकडून लिलाव काढला जातो़ पण पाणीपुरवठा विभागातील भंगार साहित्य सन 2004 नंतर स्टोअरकडे आलेच नसल्याची माहिती प्राप्त झाली आह़े 10 जून 2004 मध्ये पाणीपुरवठा विभागातील 10 एचपी मोटरपंप 6, 5 एचपी मोटरपंप 2, हॅन्डपंपमधील जुने पाईप 400 नग आणि कनेक्टिंग रॉड 135 या साहित्याचा 1 लाख 40 हजार रुपयांत लिलाव झाला. परंतु त्यानंतर पाणीपुरवठा विभागाने कोणतेही साहित्य रेकॉर्ड विभागाकडे सुपुर्द केलेले नसून लिलावही झालेला नाही़ विद्युत विभागाने भंगार साहित्य नियमित जमा केले. 2013 मध्ये विद्युत विभागातील भंगार साहित्याच्या लिलावातून मनपाला 5 लाख 78 हजार 550 रुपये प्राप्त झाले होत़े त्याचप्रमाणे 2007, 2012 मध्ये जुन्या वाहनांचादेखील लिलाव करण्यात आला असून लवकरच आणखी 12 वाहनांचा लिलाव केला जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आह़े
नगरसेवक संदीप पाटोळे यांनी 31 डिसेंबरला झालेल्या स्थायी समितीच्या सभेत भंगार साहित्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता़ त्यावेळी उपायुक्त रवींद्र जाधव यांनीही त्याबाबत कुणालाही माहिती नसल्याचे मान्य केले होत़े तसेच याबाबत आठवडाभरात माहिती देण्याचे आश्वासन दिले होत़े परंतु त्यानंतर कोणताही खुलासा प्रशासनाने केलेला नाही़ त्यामुळे भंगारातही घोटाळा झाल्याची शक्यता आह़े
दरवर्षी पाणी गळतीच्या तक्रारी येत असून त्यांची सोडवणूक करताना जलवाहिन्या, व्हॉल्व्ह, जॉईंट, नटबोल्ट, टी बदलले जातात़ पण नवीन साहित्य टाकले जाते की जुनेच साहित्य टाकले जाते हे तपासण्यासाठी मनपाकडे स्वतंत्र यंत्रणा नाही़ एकाच ठिकाणी वारंवार गळती लागत असल्याचे समोर येत असत़े तसेच गळती दुरुस्तीच्या खर्चाचा विषय स्थायी समितीसमोर येतो त्यावेळी सविस्तर टिपणी दिली जात नाही, त्यामुळे गळती नेमकी कुठे हेच कळत नसल्याचा आरोप नगरसेवक पाटोळेंनी केला होता़