आवाज करणाऱ्या बुलेटमुळे ध्वनी प्रदूषणाचा त्रास; दोंडाईचामधील वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2023 06:44 PM2023-04-14T18:44:50+5:302023-04-14T18:45:18+5:30
ध्वनी प्रदूषणाला आळा बसावा म्हणून पोलिसांची वाहतूक शाखा प्रयत्नात असली तरी दोडाईचा व दोडाईचा परिसरात काही बुलेटस्वार त्यांच्या गाडीच्या सायलेन्सरमध्ये बदल करून घेतात.
दोडाईचा (धुळे) : ध्वनी प्रदूषणाला आळा बसावा म्हणून पोलिसांची वाहतूक शाखा प्रयत्नात असली तरी दोडाईचा व दोडाईचा परिसरात काही बुलेटस्वार त्यांच्या गाडीच्या सायलेन्सरमध्ये बदल करून घेतात. त्यामुळे प्रचंड आवाज करणाऱ्या या बुलेटमुळे कानठळ्या बसू लागल्या आहेत. ध्वनीप्रदूषण करणाऱ्या या बुलेट शौकीनांवर पोलिस कारवाई करतील का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
रूबाबदार दुचाकी म्हणून बुलेटकडे पाहिले जाते. महाग असली तरी बुलेट खरेदीला अनेकजण विशेषत: तरूण प्राधान्य देत आहेत. मूळ बुलेटचा सायलेन्सरचा आवाज सौम्य असला तरी काहीजण या सायलेन्सरमध्ये बदल करून घेत आहे. त्यामुळे त्या बुलेट जोरजोरात आवाज करीत असतात. अशा आवाज करणाऱ्या बुलेट शहरातील विविध भागातून नेणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. त्या कर्णकर्कश आवाजाचा त्रास आबालवृद्धांना होत आहे. रुग्णालयासमोरून अशा बुलेट धावत असल्यामुळे रुग्णांच्या छातीचे ठोके आपोआप वाढतात. मात्र, दुचाकीवर राजरोसपणे कारवाई करणाऱ्या पोलिसांचा हात बुलटेधारकांसमोर आडवा होत नसल्याचे वास्तव आहे.
बुलेटकडे लक्ष वेधून घेण्यासाठी काही बुलेट चालकांनी सायलेन्सरमध्ये विनापरवाना तांत्रिक बदल केले आहेत.त्यामुळे फायरिंगचा कर्कश , फटाके फोडण्यासारखा आवाज येत असल्याची तक्रार आहे. कर्णकर्कश आवाजामुळे बहिरेपणा,चिडचिडेपणा वाढत आहे. ही वाहने माेठ्या घरातील व्यक्तींची असल्याने यावर पोलीस,आरटीओ विभाग दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार आहे. एकीकडे काही शहरात फटफट आवाज करणाऱ्या बुलेटचे सायलेन्सर काढून त्यावर वाहतूक पोलिसांनी बुलडोजर फिरविल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र दोंडाईचात अशी कुठलीच कारवाई होताना दिसत नसल्याचे निदर्शनास येत आहे.