अशैक्षणिक कामे थांबविण्यात यावीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 10:56 PM2020-01-05T22:56:16+5:302020-01-05T22:57:00+5:30
शिक्षक संघटना : जिल्हा परिषदेकडे मागणी
धुळे : जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे काम सोपवण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचा बोजा वाढला आहे. परिणामी त्यांचे अध्यापनाकडे दुर्लक्ष होत आहे. शासनाकडून अशैक्षणिक कामे बंद करावी विविध मागण्यांसाठी शिक्षक समितीतर्फे धरणे आंदोलन झाले.
शैक्षणिक सत्राचे शेवटचे तीन-चार महिने विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात. या कालावधीत नवोदय प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा होते. तसेच स्नेहसंमेलन, केंद्रस्तरापासून जिल्हास्तरापर्यंत क्रीडा स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन होते. याशिवाय रिड टू मी, टॅग, एमआयओसी, चेस प्रशिक्षण, इंग्रजी समृद्धी अध्ययन साहित्य प्रशिक्षण, किशोरवयीन मुलींच्या मासिक पाळीविषयी महिला शिक्षकांचे प्रशिक्षण, तंबाखूमुक्त शाळा अभियान, कर्करोग जाणीव-जागृती मोहीम, केंद्रस्तरीय शिक्षण परिषद, विभागीय व जिल्हास्तरीय गुणवत्ता विकास कार्यक्रम, अध्ययनस्तर निश्चिती तपासणी कार्यक्रम, माहिती अधिकार कायदा प्रशिक्षण आदी कामांचा शिक्षकांवर भार आहे. त्यातून शिक्षकांचे अध्यापनाच्या कामाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शासनाने शिक्षकांवर लादलेली अशैक्षणिक कामे कमी करावीत, अशी मागणी निवेदन जिल्हा परिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या आंदोलनात समितीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील, बापू पारधी, मनोज निकम, जितेंद्र राजपूत, आनंद पाटील, रमेश पाटील, गोकूळ पाटील, अनिल नहिरे, दंगल शिंदे, प्रभाकर रायते, सुभाष पगारे, गोकूळ सोनार, अनिल सोनवणे, रामचंद्र वाघ, महेंद्र पाटील, कैलास ईशी, रामचंद्र भलकारे, मोतीलाल गोवेल, प्रमोद सोनवणे, सुरेश माळी, सुनील सोंजे, मुरलीधर रोकडे, अरुण खैरनार, चंपालाल पाटील, मधुकर पाटील, आनंदा हालोरे, गोपाल लोहार, संदीप पाटील, विजय बोरसे, रमेश कोळी, श्रीकृष्ण सावळे, मुकेश कोळी, गोरख शिंदे, विजय भोई, काशिनाथ वाडिले, चंचल नागरे, प्रदीप पाटील आदींसह सहभागी झाले होते.