मे महिन्यात तिशीच्या आतील एकाही रुग्णाचा मृत्यू नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:26 AM2021-05-28T04:26:45+5:302021-05-28T04:26:45+5:30
धुळे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वृद्ध रुग्णांसोबत तरुणांचेही मृत्यू झाले आहेत. मात्र, मे महिन्यात येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात तिशीच्या ...
धुळे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वृद्ध रुग्णांसोबत तरुणांचेही मृत्यू झाले आहेत. मात्र, मे महिन्यात येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात तिशीच्या आतील एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
१ मे ते २६ मे या कालावधीत ४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. धुळे जिल्ह्यातील ३८ तर इतर जिल्ह्यांतील ४ रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये, ५० पेक्षा जास्त वयाचे अधिक रुग्ण आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिकांचे मृत्यू अधिक झाले होते. दुसऱ्या लाटेत मात्र बाधित रुग्णांमध्ये सर्वाधिक संख्या ही तरुणांची होती. तसेच तरुणांच्या मृत्यूचेही प्रमाण लक्षणीय होते. मे महिन्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र आहे. दैनंदिन बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी घसरण झाली आहे. तसेच मृतांची संख्याही घटली आहे. मात्र, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी ऑक्सिजन प्रकल्प सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
धुळे शहरातील अधिक रुग्णांचे मृत्यू -
१ मे ते २६ मे या कालावधीत मृत झालेल्यांमध्ये सर्वाधिक धुळे शहरातील रुग्णांचा समावेश आहे. तसेच धुळे तालुक्यातील मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. धुळे शहरातील १७ तर धुळे तालुक्यातील १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भाग हॉटस्पॉट ठरला होता. विशेषतः शिंदखेडा व साक्री तालुक्यात आढळलेल्या बाधित रुग्णांची संख्या जास्त होती. मात्र, मे महिन्यात तेथील मृत्यूचे प्रमाण घसरले आहे. साक्री तालुक्यात ३, शिरपूर ३ तर शिंदखेडा तालुक्यातील २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर इतर जिल्ह्यातील चार रुग्णांचा हिरे महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
गत आठवड्यात तीन रुग्णांचा मृत्यू -
कोरोनाची दुसरी लाट ओसरायला लागली आहे. २० ते २६ मे या कालावधीत वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असलेल्या तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एप्रिल महिन्यात दररोज चार ते पाच रुग्णांचा मृत्यू होत होता. कोरोनाचा संसर्ग कमी होत असला तरी अजूनही कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. नागरिकांची बेफिकिरी कोरोनाचा संसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरू शकते.