सांडपाणी व्यवस्थापन न केल्याने मनपाला नोटीस
By admin | Published: March 3, 2017 12:04 AM2017-03-03T00:04:05+5:302017-03-03T00:04:05+5:30
धुळे : शहरात सांडपाणी व्यवस्थापन न करण्यात आल्याने प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे़ त्यामुळे तातडीने कार्यवाही करावी, अशी नोटीस प्रदूषण नियंत्रण मंडळाने मनपाला बजावली होती़
धुळे : शहरात सांडपाणी व्यवस्थापन न करण्यात आल्याने प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे़ त्यामुळे तातडीने कार्यवाही करावी, अशी नोटीस प्रदूषण नियंत्रण मंडळाने मनपाला बजावली होती़ अमृत योजनेंतर्गत सांडपाणीप्रश्नी कार्यवाही करण्याचे आश्वासन आयुक्त संगीता धायगुडे यांनी दिले आहे़
शहरात सांडपाणी व्यवस्थापन तसेच घनकचरा संकलन व प्रक्रिया आवश्यक आहे़ त्यासाठी दरवर्षी अर्थसंकल्पात २५ टक्के स्वतंत्र तरतूद केली जाते़ मात्र मनपातर्फे प्रदूषण नियंत्रणासाठी प्रयत्न होत नसल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने मनपाला नोटीस बजावली होती़ १५ दिवसांत समाधानकारक खुलासा न केल्यास प्रशासनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा इशारादेखील या नोटिसीद्वारे देण्यात आला होता़ याच प्रश्नावर नुकतीच मंत्रालयात बैठक झाली असून या बैठकीस प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी एस़डी़पाटील, आयुक्त संगीता धायगुडे व अन्य अधिकारी उपस्थित होते़ या बैठकीत वाढत्या प्रदूषणाचे नियंत्रण करण्यासाठी आवश्यक प्रयत्न व उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली़ सांडपाणी प्रकल्पासाठी मनपाने भुयारी गटार योजनेचा प्रस्ताव केंद्र सरकारला सादर केला असून तो काही वर्षांपासून प्रलंबित आहे़ मात्र तरीदेखील सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले़ तर अमृत योजनेत निधी मिळाल्यास घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्पही मार्गी लावला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले़ प्रदूषण नियंत्रण मंडळानेच महापालिकेला याप्रश्नी कार्यवाही करण्यासाठी निधी देण्याची शिफारस करावी, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले़