तयार घरांच्या खरेदीसाठी आता अनुकूल स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 10:49 PM2019-09-06T22:49:13+5:302019-09-06T22:49:31+5:30
चर्चासत्राचा सूर : रेरा कायदा, बांधकाम नियमावल्ीामुळे अनिष्ट बाबी दूर, दर वास्तव पातळीवर, गृहकर्जही स्वस्त
धुळे : नोटाबंदी, त्यानंतर जीएसटीची अंमलबजावणी यामुळे मध्यंतरीच्या काळात अडचणीत आलेल्या बांधकाम क्षेत्रात (रिअल इस्टेट) मोठे स्थित्यंतर झाले. आता महारेरा कायद्याचा अंमल, रिझर्व्ह बॅँकेने रेपो रेट कमी केल्यानंतर बॅँकांनीही घटविलेले गृहकर्जाचे दर, स्थित्यंतरानंतर घरांची वास्तव किंमत (बॉटम रेट) अशी अनुकूल स्थिती निर्माण झाल्याने आता या क्षेत्राला चांगले दिवस आले आहेत. त्यामुळे तयार घरांच्या खरेदीसाठी कधी नव्हे एवढे अनुकूल वातावरण निर्माण झाल्याचा सूर क्रेडाई संघटना पदाधिकारी, बांधकाम व्यावसायिक व बॅँक अधिकारी यांच्या चर्चासत्रात उमटला.
‘लोकमत’च्या साक्रीरोडवरील जिल्हा कार्यालयात झालेल्या या चर्चासत्रात क्रेडाईचे अध्यक्ष संजय देसले, उपाध्यक्ष योगीराज मराठे, सदस्य दीपक अहिरे, उमेश अग्रवाल, किशोर सोनार, चंदन पल्हाणी, संजय अहिरराव, स्टेट बॅँकेच्या गृह कर्ज शाखेचे उपव्यवस्थापक सर्वेश कनोजिया व शाखाप्रमुख हर्षा श्रेणॉय सहभागी झाले.
बांधकाम क्षेत्रास शिस्त लावण्यासाठी लागू झालेला महारेरा कायदा, राज्यातील १४ ड वर्ग महापालिकांसाठी (धुळे मनपाही समाविष्ट) नवी बांधकाम नियमावली (न्यू डीसीआर), किंमतींमधील सूज घटून तयार घरांच्या वास्तव पातळीवर आलेल्या किमती आणि खाली आलेले बॅँकांच्या गृहकर्जाचे दर या सर्व बाबी सध्याच्या अनुकूल स्थितीसाठी कारणीभूत ठरल्या आहेत. एकीकडे सोन्याचे दर वाढत असताना गुंतवणूकदारांना रिअल इस्टेटचे क्षेत्र आकर्षित करत असल्याने गुंतवणूक वाढत आहे. त्यामुळे सामान्य ते लक्झरीयस घरेही वाजवी दरात उपलब्ध होत आहेत. नोटबंदीपूर्वी हा धनदांडग्यांचा व्यवसाय, काळ्या पैशाचा वापर अशी या व्यवसायाची स्थिती होती. त्यामुळे किमती, दर वाढून एक प्रकारे व्यवसायाला सूज आली होती. परंतु रेरा कायद्याने त्यास चाप बसला असून घरांच्या किमती वास्तव पातळीवर म्हणजे सर्वसामान्यांच्या अगदी आवाक्यात आल्या आहेत.
महारेरा कायद्यामुळे आता त्यासाठीच्या संकेतस्थळावर बांधकाम व्यावसायिकांना प्रकल्पाची नोंदणी करावी लागते. त्यात साहित्याचाही अंतर्भाव होतो. पूर्वी व्यावसायिक कर्ज एका प्रकल्पासाठी घेत तर खर्च भलतीकडे म्हणजे दुसºयाच प्रकल्प किंवा कामावर खर्च करत. त्यामुळे मूळ प्रकल्पाचे काम रखडत असे. ग्राहकांना सांगितलेल्या वेळेत घर मिळत नसे. परंतु ती परिस्थिती आता राहिलेली नसून स्थितीत आमुलाग्र बदल झाला आहे. तीन राष्टÑीय महामार्ग, येणारा डीएमआयसी प्रकल्प, लॉजिस्टिक हब, भरपूर पाणी, वैद्यकीय शिक्षणासह उपलब्ध कुशल मनुष्यबळ यामुळे आगामी काही वर्षांत नाशिकपेक्षा धुळ्यात गुंतवणूक वाढणार असल्याने घरांना मागणी वाढणार असल्याचे चर्चेत मान्यवरांकडून सांगण्यात आले.