आता वेध जिल्हा परिषद निवडणुकीचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 01:26 PM2019-10-31T13:26:12+5:302019-10-31T13:26:45+5:30
पडघम : गट-गणनिहाय मतदार याद्या विभाजनाचे काम पूर्ण, निवडणूक आयोगाच्या पुढील आदेशाची प्रशासनाला प्रतीक्षा
धुळे : विधानसभेपाठोपाठ आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे वेध अनेकांना लागले आहेत. दरम्यान निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार गट आणि गणनिहाय मतदार याद्या विभाजनाचे काम पूर्ण झाल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (प्रशासन) उन्मेश महाजन यांनी दिली आहे.
धुळ्यासह राज्यातील पाच जिल्हा परिषदा व पंचायत समितींची मुदत डिसेंबर २०१८ मध्येच संपली आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी २७ आॅगस्ट २०१८ रोजी आरक्षण सोडत काढण्यात आली होती. मात्र आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने त्यावर हरकत घेण्यात आली होती. या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. दरम्यान राज्य शासनाने जिल्हा परिषदेला मुदतवाढ दिली. परंतु सर्वोच्च न्यायालयाने शासनाने दिलेली मुदतवाढ रद्द करून, आॅगस्ट महिन्यात कार्यकारिणी बरखास्त केली. उच्च न्यायालयातील याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
यापूर्वी झालोल्या सुनावणी दरम्यान नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या लोकसंख्येची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने दोन महिन्यांची मुदत मागितली होती. ती मुदत २७ आॅक्टोबरलाच संपुष्टात आलेली आहे. ही माहिती वेळेत न दिल्यास राज्य निवडणूक आयोग १९ जुलै २०१९च्या आदेशाप्रमाणे विद्यमान आरक्षणाच्या आधारावर निवडणूक कार्यक्रम तत्काळ जाहीर करावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मागील सुनावणीच्यावेळीच दिलेले आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयानंतर निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राजकीय पक्षांकडून निवडणुकीची चाचपणी सुरू
*धुळे जिल्हा परिषदेचे एकूण ५६ गट असून, ११२ गण आहेत. पूर्वीच्या नियोजनानुसार अगोदर जिल्हा परिषद निवडणूक नंतर विधानसभेची निवडणूक होणार होती. मात्र आरक्षणाचा वाद न्यायालयात पोहचल्याने, नियोजित वेळेत जिल्हा परिषदेची निवडणूक होऊ शकलेली नाही. दरम्यान नुकतीच विधानसभेची निवडणूक आटोपली आहे. यात धुळ्े शहर मतदार संघातून एमआयएम, धुळे ग्रामीण मतदार संघातून कॉँग्रेस, शिरपूर, शिंदखेडा मतदार संघातून भाजप व साक्री विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवाराने विजय मिळविला आहे.
*इतर पक्षांच्या मानाने भाजपला या निवडणुकीत एका जागेचा लाभ झालेला आहे. तर कॉँग्रेसला दोन जागांचे नुकसान सोसावे लागले आहे. या निवडणुकीत शिवसेना व राष्टÑवादी पक्षाने प्रत्येकी एक-एक जागा लढविली होती. मात्र त्यांना यश आलेले नाही.
*विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या आधारावर राजकीय पक्षांना आगामी काळात होणाºया जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची चाचपणी सुरू केलेली आहे. आगामी महिन्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक होण्याची शक्यता असल्याने, इच्छुकांनीही तयारी सुरू केलेली आहे. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांचा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत कोणाला लाभ मिळतो याचीही आकडेमोड करण्यात राजकीय पक्षांचे पदाधिकारी व्यस्त झालेले आहेत.