अधिकाऱ्यांनी गावातच थांबणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:35 AM2021-05-26T04:35:53+5:302021-05-26T04:35:53+5:30
येथील ग्रामविकास अधिकारी, तलाठी व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी हे मुख्यालयी न राहता शिरपूर, धुळ्याहून दररोज ये-जा करतात. ...
येथील ग्रामविकास अधिकारी, तलाठी व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी हे मुख्यालयी न राहता शिरपूर, धुळ्याहून दररोज ये-जा करतात. यामुळे काही अंशी कोरोना परिस्थिती हाताळण्यास विलंब झाला. परिणामी रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून मुख्यालयी थांबणे गरजेचे आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनीदेखील पुढाकार घ्यावा, अशी मालपूर ग्रामस्थांची मागणी आहे.
मागील महिन्यात बाधितांच्या संख्येत दररोज वाढ होत होती. तसेच मृत्यूदरदेखील वाढला होता. गावातील ज्येष्ठ नागरिकांसह युवकांनादेखील यात जीव गमवावा लागला. आता परिस्थिती काहीशी आटोक्यात आहे. मालपूर कोरोनाचे हाॅटस्पाट असताना प्रशासनाचे मुख्य दुवा समजले जाणारे ग्रामविकास अधिकारी, महसूलचे तलाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे एकही वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी वास्तव्य करताना दिसून आले नाहीत. या भयंकर संकटात गाव बेवारस दिसून आले. वेळप्रसंगी मोबाईलवरून झाल्या प्रकाराची माहिती यांना दिली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे कोरोनाबाधित रुग्णांचे काॅन्टॅक्ट ट्रेसिंग अपेक्षित ताकदीने झाले नाही. परिणामी पाॅझिटिव्ह रुग्ण सुपर स्प्रेडर ठरून रुग्णवाढीचा धोका बळावत गेला.
कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या ळी मालपुरातील शासकीय यंत्रणा पदाधिकारी तसेच ग्रामस्थदेखील प्रचंड सतर्क होते. युवक रात्रंदिवस गावाच्या वेशीवर खडा पहारा देताना दिसून येत होते. कोरोना हाॅटस्पाट किंवा बाधित क्षेत्रातून आल्यावर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात चाचणी करेपर्यंत नजर ठेवत होते तर गावात कोणाच्या घरी कोण आले आहे, इथपर्यंत सतर्कता बाळगली जात होती. मात्र दुसऱ्या लाटेत याचा अभाव दिसून आला. शासकीय यंत्रणांनीदेखील बॅरिकेटिंग गावात कुठे केले नाही. आता पुन्हा हे दिवस बघायला मिळू नयेत म्हणून अधिकाऱ्यांनी मुख्यालयी थांबावे, अशी मागणी होत आहे.