कन्या शाळेची जीर्ण इमारत जमीनदोस्त करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 10:50 PM2019-06-27T22:50:43+5:302019-06-27T22:51:01+5:30
मालपूर : वारा, वादळ, पावसामुळे गंभीर दुर्घटना घडण्याचा धोका; शिक्षण विभागाने लक्ष देण्याची गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील केंद्रीय जिल्हा परिषद कन्या शाळा नं. २ ची इमारत जीर्ण झालेली आहे. या शाळेजवळच अंगणवाडीचे वर्ग भरतात. जीर्ण झालेल्या भिंती पावसामुळे पडून गंभीर दुर्घटना घडण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या शाळेची इमारत जमीनदोस्त करण्यात यावी, अशी मागणी पालक वर्गातून केली जात आहे.
मालपूर येथे केंद्रीय जिल्हा परिषदेची शाळा असून या स्वतंत्र तीन शाळा आहेत. शाळा नं. १ व कन्या शाळा नं. २ या एकाच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ स्वतंत्र भरतात. पैकी कन्या शाळेची पश्चिमेकडील इमारत नादुरुस्त झाली आहे.
येथे तीन वर्गखोल्या असून दोन वर्गांना नवीन पत्रा टाकला आहे. तर एका खोलीचा अर्धवट उडालेला पत्रा असून भिंती देखील जीर्ण झालेल्या आहेत.
पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. पावसाने काही प्रमाणात हजेरी लावली आहे. मात्र अशा परिस्थितीत पाऊस जोरदार होवून वादळ वारा आला तर येथील पत्रा उडून भिंती कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या इमारतीला लागून जवळच अंगणवाड्यांचे वर्ग भरत असतात. तसेच शाळा नं. १ व २ मधील लहान विद्यार्थ्यांचा पटांगणात सतत वावर असतो. अशापरिस्थितीत ही इमारत वादळ वाºयासह पावसाने जोरदार हजेरी लावल्यास गंभीर घटना घडून कोणाला जीव गमवावा लागल्यास अन्यथा जखमी झाल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न पालकवर्गातून व्यक्त करण्यात येत आहे. शिक्षण विभागाने याची गंभीर दखल घेऊन, शाळा इमारतीची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
ही कन्या शाळा नं. २ची इमारत असून मागील वर्षी देखील पाडण्याचा प्रस्ताव दिला होता. आता पुन्हा तसा प्रस्ताव तयार करुन शिक्षण विभागाला पाठवण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना देतो.
- ए.जी. नगराळे,
केंद्र प्रमुख मालपूर