थर्टी फर्स्टची रात्र अखेरची, शंभर फूट खड्ड्यात कार पडून दोघे ठार
By देवेंद्र पाठक | Published: January 1, 2024 07:18 PM2024-01-01T19:18:13+5:302024-01-01T19:18:25+5:30
शिरपुरात नववर्षाच्या आनंदावर पडले विरजण, मध्यरात्रीची घटना.
शिरपूर : नववर्षाचा पहिलाच दिवस शिरपूरकरांसाठी वाईट बातमी घेऊन आला. शिरपूर विमानतळानजीक भरधाव कार खड्ड्यात उतरल्याने गंभीर जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली. प्रवीण शिवाजी पाटील (वय ४२) आणि प्रशांत राजेंद्र भदाणे (वय ३५) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. रात्रभर दोघेही गंभीर अवस्थेत पडून होते. परिणामी त्यांचा मृत्यू झाला. सकाळी ही बाब उजेडात आली. शिरपूर येथील क्रांतीनगरात राहणारे प्रवीण शिवाजी पाटील (वय ४२) आणि शिरपूर येथील मातोश्री कॉलनीत राहणारे बांधकाम व्यावसायिक प्रशांत राजेंद्र भदाणे (वय ३५) हे दोघे चारचाकी वाहनाने शिरपूर चोपडा रस्त्यावरून जात होते. शिरपूर विमानतळ रस्त्यावर त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगात असणारी कार रस्त्यालगत असलेल्या मोठ्या खड्ड्यात जाऊन कोसळली. सुमारे १०० फूट असलेल्या या खोल खड्ड्यात काटेरी झुडपांचे प्रमाण अधिक आहे. कार कोसळताच दोघांनाही डोक्याला गंभीर दुखापत झाली. मध्यरात्रीची वेळ असल्याने त्यांना वाचविण्यासाठी कोणीही येऊ शकले नाही.
सोमवारी सकाळी या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या लोकांना सदर अपघाती वाहन दिसल्याने ही घटना उघडकीस आली. लोकांनी अपघाताच्या ठिकाणी जाऊन माहिती घेतली असता दोघेही गंभीर जखमी होऊन मृतावस्थेत आढळून आले. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत काटेरी झाडाझुडपांमधून वाट काढत दोघा मृतांना कारच्या बाहेर काढण्यात आले. शिरपूर कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी दोघांना मयत घोषित केले.
अपघातात मृत झालेले प्रवीण पाटील यांचे शहरातील इंदिरा हॉस्पिटलजवळ कॅफेचे दुकान आहे. ते राजकीय क्षेत्रात सक्रिय होते. त्यामुळे त्यांचा जनसंपर्क खूप हाेता. तर, प्रशांत भदाणे हे बांधकाम व्यावसायिक म्हणून कार्यरत हाेते. दोघेही शिरपूरवासीयांना परिचित होते. त्यांच्या अपघातामुळे हळहळ व्यक्त होत आहे.