वाहनाच्या धडकेत एक ठार, डंपर अंगावरून गेल्याने दुसऱ्याचा मृत्यू
By देवेंद्र पाठक | Published: December 21, 2023 10:12 PM2023-12-21T22:12:22+5:302023-12-21T22:12:40+5:30
दोन अपघात : असली गावासह बाभळे शिवारातील घटना
धुळे : शिरपूर तालुक्यातील असली गावासह शिंदखेडा तालुक्यातील बाभळे फाट्यावर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी बुधवारी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली.
असली गावाजवळील घटना
शिरपूर तालुक्यातील भोरखेडा येथून असली गावाकडे नितीन रामेश्वर कोळी (वय २८, रा. असली ता. शिरपूर) हा तरुण पायी घरी जात होता. मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने येत असलेल्या अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. अपघाताची ही घटना शिरपूर ते चोपडा रोडवरील असली गावाच्या फाट्याजवळ घडली. यात फेकला गेल्याने नितीन कोळी याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर वाहनचालकाने वाहनासह पळ काढला. गंभीर जखमी अवस्थेत नितीन कोळी याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डोक्याला अधिक मार लागल्याने उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी युवराज शिवा कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून थाळनेर पोलिस ठाण्यात बुधवारी मध्यरात्री गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
बाभळे शिवाराजवळची घटना
शिंदखेडा तालुक्यातील बाभळे शिवारातील जामफळ धरण परिसरातील मोकळ्या जागेत सखाराम बारकू पाटील (वय ६२, रा. लोहगाव, ता. शिरपूर हमु जामफळ धरण) हे झाेपलेले होते. अशातच एमएच १८ बीजी ९४०६ क्रमांकाचा डंपर भरधाव वेगाने आल्याने पाटील यांच्या अंगावरून वाहन चालून गेले. ही घटना जामपळ धरण शिवारात सोमवारी पहाटे ४ ते साडेचार वाजेच्या सुमारास घडली. यात गंभीर जखमी झाल्याने सखाराम पाटील यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी सुकलाल सकाराम पाटील (वय २६, रा. लोहगाव ता. शिरपूर, हमु तराड कसबे ता. शिरपूर) या मजुराने दिलेल्या फिर्यादीवरून डंपर चालकाविरोधात बुधवारी शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक गोरावडे करीत आहेत.