कुडाशी-पिंपळनेर रस्त्यावर रिक्षा उलटून अपघात, १ ठार, २ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 07:35 PM2020-08-21T19:35:16+5:302020-08-21T19:35:32+5:30
गतिरोधकाची मागणी : ५ दिवसापूर्वी ग्रामस्थांनी केला होता रास्तारोको
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळनेर : साक्री तालुक्यातील कुडाशी गावाकडून पिंपळनेरकडे येणारी अॅपेरिक्षा मानव केंद्राजवळ उलटली. या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पिंपळनेर पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
कुडाशी गावाकडून पिंपळनेरकडे येणाऱ्या एम.एच. ४१ सी.५४०१ क्रमांकाची अॅपेरिक्षा मानव केंद्राजवळ उलटली. त्यात लक्ष उत्तम घरटे (३० रा.पिंपळनेर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रसाद उत्तम घरटे (२८ रा.पिंपळनेर) व विशाल पुंडलिक गवळी (२८ रा.शिरवाडे) हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन जखमींना पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लक्ष घरटे यास मृत घोषित केले. जखमींवर उपचार सुरू आहेत. पिंपळनेर पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.
मागील आठवड्यात याच जागेवर एका मोटरसायकल चालकास पिकअप वाहने धडक दिली होती. या अपघात मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला होता. त्यावेळेस गतिरोधक बनवण्यासाठी नागरिकांनी रास्तारोको आंदोलन देखील केले होते. सदर अपघाताची घटना घडून आता ५ दिवस उलटत नाही तोच दुसरी अपघाताची घटना घडल्याने नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रीया उमटत आहे. आता तरी बांधकाम विभाग गतिरोधक टाकण्याचे काम करेल का, असा सवाल नागरिक करीत आहेत.