गावठी दारू निर्मितीचे एक लाखाचे साहित्य जप्त
By admin | Published: January 23, 2017 12:40 AM2017-01-23T00:40:30+5:302017-01-23T00:40:30+5:30
पिंजारझाडी येथे गावठी दारू तयार करण्याचे साहित्य विक्री करणा:यास एकास साक्री पोलिसांनी रविवारी अटक केली
साक्री : तालुक्यातील आदिवासी भागातील पिंजारझाडी येथे गावठी दारू तयार करण्याचे साहित्य विक्री करणा:यास एकास साक्री पोलिसांनी रविवारी अटक केली असून त्याच्याकडून एक लाख रुपये किमतीचे दारू तयार करण्याचे साहित्य, देशी, विदेशी दारू जप्त केली आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव गणेश मोतीलाल चौधरी (34, पिंजारझाडी) आहे.
साक्री पोलिसांनी गणेश चौधरी याच्या किरणा दुकानात धाड टाकली असता, पोलिसांनी 50 किलो वजनाचे प्रत्येकी 50 गोणी दारू गाळण्याचा गूळ, 1500 रुपयांची बिअर, 2500 रुपये किमतीची देशी दारू, 12 हजार रुपये किमतीच्या नवसागरच्या गोण्या जप्त केल्या. सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील व त्यांच्या सहकार्यानी ही कारवाई केली. पोलीस नाईक प्रकाश सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला. तपास ए. डी. वसावे करीत आहे.
पिंपळनेरतही दारूचे साहित्य नष्ट
पिंपळनेर : पिंपळनेर पोलिसांनी शनिवारी पांझरा नदीपात्रात केलेल्या कारवाईत गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी असलेले रसायन व हातभट्टी लावण्यासाठी असलेले साहित्य नष्ट केले आहे. सहायक पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांच्या मार्गदर्शनाने पोलीस निरीक्षक योगेश खटकळ व पोलीस पथकाने ही कारवाई केली. यावेळी ललित पाटील, एस. के. ठाकूर, ज्ञानसिंग पावरा, योगेश वानखेडे, शेखर वाडेकर, तौफिक सैयद, मधुकर पगारे, अनंत चव्हाण उपस्थित होते.