गणपती पुलावरुन एकेरी वाहतूक सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 10:05 PM2020-05-11T22:05:41+5:302020-05-11T22:06:03+5:30
देवपूरातील कंटेनमेंट झोनमुळे निर्णय : अत्यावश्यक वाहतुकीला प्राधान्य
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : कोरोना विषाणुचा संसर्ग व प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेता शहरातील वर्दळीचे पूल बंद करण्यात आले़ लहान पुलावरुन एकेरी वाहतूक सुरु असतानाच गणपती मंदिराजवळील पूल दीड महिन्यांपासून बंद होता़ मात्र, देवपुरात कंटेनमेंट झोन जाहीर झाल्याने गणपती पूल एकेरी वाहतुकीसाठी सोमवारपासून खुला करण्यात आलेला आहे़
देवपुरातील सुधा हॉस्पिटल ते सावरकर पुतळा पावेतोचा भाग कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आलेला असल्याने देवपुरातील इंदिरागार्डन नकाणे रोड परिसरातील नागरिकांना सावरकर पुतळ्याकडे जाण्यात येणारा मार्ग बंद करण्यात आलेला आहे़ नागरिकांना आपत्कालिन व जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीदार, दुकानदार, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांची संख्या विचारात घेऊन सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून काही बदल करण्यात आलेले आहेत़
त्यात ११ मे पासून गणपती मंदिर पुल हा मोराणकर यांच्या निवासस्थानापासून सिध्देश्वर हॉस्पिटल ते गणपती मंदिराकडे जाण्यासाठी हा पूल वाहतुकीसाठी एक मार्गी सुरु करण्यात आलेला आहे़ तसेच पांझरा नदीवरील सावरकर पुतळा ते शहराकडे येणारा पांझरा नदीवरील पूल हा देखील एकमार्गी खूला असणार आहे़ त्याचप्रमाणे शहरातून देवपूर परिसरात जाण्यासाठी कालिका माता मंदिर ते जयहिंद जलतरण तलाव या दरम्यान असलेला फरशी पूल हा एकमार्गी सुरु ठेवण्यात आलेला आहे़
गणपती पुलावरुन वाहतुक सुरु केली असली नागरिकांनी विनाकारण गर्दी करु नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे़ शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे़ त्यामुळे लॉकडाउनमध्ये कोणतीही सवलत दिलेली नाही़ जीवनावश्यक वस्तुंची सेवा सुरु आहे़ परंतु नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे़ अन्यथा कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे़
अत्यावश्यक सेवा पुरविणारे शासकीय अधिकारी कर्मचारी, अत्यावश्यक साधन सामुग्री वाहतूक करणारे वाहनधारक यांनी त्यांच्याकडील आवश्यक पुरावे पडताळून या पुलाचा वापर करण्याची परवानगी आहे़ याकामी पोलिसांना सहकार्य करावे़ आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल़
- आऱ एम़ उपासे
पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा, धुळे