कांद्याची परराज्यात होतेय विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 10:35 PM2019-12-09T22:35:59+5:302019-12-09T22:36:52+5:30
मालपूर : ९ ते १० हजार रुपये क्विंटलचा भाव, दरात तेजीमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान
मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर परिसरातील कांदा विक्रीसाठी परराज्यात जात आहे. कांद्याला ९ ते १० हजार रुपये क्विंटलचा भाव मिळत आहे. दरात तेजी आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
कांदा कधी शेतकºयाच्या तर कधी ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणतो. कांद्याच्या भावात यावर्षी चांगलीच तेजी आल्यामुळे शेतकºयांच्या चेहºयावर समाधानाचे भाव दिसून येत आहेत. यातून अनेक शेतकºयांनी प्रगती साधली आहे. मात्र, परतीच्या पावसाने घात केल्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
मालपूरसह परिसरातील अक्कलकोस, हाट्टी, ऐचाळे, शनिमांडळ, वाडी आदी परिसरातील शेतकरी त्यांच्या शेतातील कांदा सध्या मध्यप्रदेशातील इंदूर येथील राजमाता अहिल्याबाई होळकर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी घेऊन जात आहेत. इंदूर येथे कांद्याचे मोठे मार्केट असून ३ डिसेंबर रोजी कांद्याला सरासरी ९ ते १० हजार रुपये क्विंटल दर होता. यात दिवसागणिक वाढ होत असल्याचे सांगितले जात आहे.
किरकोळ बाजारात मध्यम दर्जाचा कांदा ७० ते ८० रुपये किलोने विकला जात आहे. हा कांदा आता शंभरी पार करेल. मात्र जोपर्यंत शेतकºयाच्या घरातील कांदा संपत नाही, तोपर्यंत सरकारने कांदा आयात करण्याची घाई करु नये, अशी येथील कांदा उत्पादकांची मागणी आहे. बºयाच वर्षांनंतर कांदा तेजीत विकला जात आहे. शेतकरी हिताचा देखील विचार झाला पाहिजे, अशी प्रतिक्रीया मालपूर येथील शेतकºयांकडून व्यक्त होत आहे.
नाशिक जिल्ह्यातील उमराण बाजार समितीमध्ये देखील येथील शेतकरी कांदा विक्रीसाठी घेऊन जातात. तेथे उन्हाळी कांद्याला १२ हजार ५०० रुपये क्विंटलप्रमाणे सर्वाधिक भाव मिळाल्याचे समजते. सरासरी ८ ते ९ हजार भाव असून लाल कांद्याला सहा हजारापर्यंत भाव आहे.
उन्हाळी कांद्याची आवक आता कमी झाली असून शेतकºयांनी चाळीत साठवलेला कांदाही संपत आला आहे. तर नवीन कांद्याला अवकाळी पावसाचा फटका बसल्याने त्याचे उत्पादन घटले आहे. परतीच्या पावसाने घात केला नसता तर यावर्षी बळीराजाला अच्छे दिन पाहायला मिळाले असते. अपेक्षित प्रमाणात नवीन कांदा बाजारात न आल्याने भावात वाढ झाली आहे. मात्र, शेतकºयांचा कांदा संपत नाही तोपर्यंत हा दर टिकून रहावा, अशी मालपूर परिसरातील शेतकºयांना अपेक्षा आहे.