विलगीकरणातील केवळ १.५४ टक्के रुग्णांना भासली उपचारांची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 06:35 PM2020-08-25T18:35:33+5:302020-08-25T18:40:19+5:30
गृह विलगीकरणाला चांगला प्रतिसाद
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे लक्षणे नसलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १ हजार ३६ रुग्णांना गृह विलगीकरणाचा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे. त्यापैकी ४८० रुग्णांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाला आहे. सध्या ५५६ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. विलगीकरण दरम्यान, केवळ १.५४ टक्के रुग्णांना उपचारांची गरज भासली असून १६ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.
गृह विलगीकरणात कोणाला ठेवतात
कोरोनाची कोणतेही लक्षणे नसलेल्या मात्र कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना गृह विलगीकरणाचा सल्ला दिला जातो. त्यासाठी घरात स्वतंत्र खोली व शौचालय असणे गरजेचे आहे. तसेच घरात काळजी घेणारी व्यक्ती असावी. एकूण १७ दिवसांचा गृह विलगीकरणाचा कालावधी असतो. विलगीकरणादरम्यान रुग्णालयाकडून रुग्णाशी वेळोवेळी संपर्क साधला जातो.
विलगीकरणात काय काळजी घ्यावी
विलगीकरणादरम्यान रुग्णाने एका स्वतंत्र खोलीतच राहावे. तसेच रुग्णाची काळजी घेणाऱ्या व्यक्तीने मास्कचा वापर केला पाहिजे. मास्कच्या पुढील बाजूस स्पर्श करू नये. बाधित व्यक्तीला जेवण देण्यापूर्वी ४० सेकंद हात साबणाने धुवावे. तसेच बाधित रुग्णाची काळजी घेणाºया व्यक्तीने स्वत:च्या प्रकृतीचे परीक्षण केले पाहिजे व ताप, सर्दी, खोकला आदी लक्षणे जाणवल्यास कोरोनाची चाचणी करावी अशा सूचना आरोग्य विभागाने केल्या आहेत.
प्रतिक्रिया-
विलगीकरणाबाबत विविध माध्यमातून चांगली जनजागृती झाली आहे. विलगीकरणात असलेल्या अत्यल्प रुग्णांना पुन्हा रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.
डॉ.विशाल पाटील, जिल्हा कोरोना नोडल अधिकारी धुळे