सोनगीर पोलिसांच्या दिमतीला एकच वाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 09:26 PM2020-04-16T21:26:15+5:302020-04-16T21:26:36+5:30
३२ गावांना पेट्रोलिंग करतांना करावी लागते कसरच, अजून एका वाहनाची आवश्यकता
आॅनलाइन लोकमत
सोनगीर (जि.धुळे) : सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमिवर पोलिसांना संचारबंदीचे काम करावे लागत आहे. मात्र सोनगीर पोलीस स्टेशनच्या दिमतीला केवळ एकच वाहन आहे. त्यामुळे या पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या सुमारे ३२ गावांमध्ये गस्त, तसेच पेट्रोलिंग करतांना पोलिसांना कसरत करावी लागत आहे. सोनगीर पोलीस स्टेशनला अजून एका वाहनाची आवश्यकता आहे.
मुबंई-आग्रा महामार्गावरील सोनगीर हे धुळे तालुक्यातील बºयापैकी मोठे गाव आहे. सोनगीर पोलीस स्टेशनांतर्गत सोनगीरसह ३२ गावे येतात. या पोलीस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षक दर्जाचे एक अधिकारी व ३८ पुरुष व महिला कर्मचारी मिळून एकूण ३९ जणांच्या खांद्यावर कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी आहे. दरम्यान पोलीस ठाणेच भौगोलिक क्षेत्र ६६० चौरस किलोमीटर इतके आहे. या पोलीस स्टेशन अंतर्गत २७ ग्रामपंचायती येतात. ३२ गावांमधील पूर्व व पश्चिमेला शेवटच्या गावाचे अंतर हे ४५ ते ५० किलोमीटर एवढे आहे. दरम्यान हे अंतर पार करण्यासाठी खूप वेळ जात असतो. त्यात रस्त्यांची दयनीय अवस्था पाहता शेवटच्या गावापर्यंत पोहचणे पोलिसांना खूप अवघड जात असते. दरम्यान पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या गावांमध्ये गस्ती घालण्यासाठी एकच सरकारी वाहन आहे. या व्यतिरिक्त पोलीस कर्मचारी आपल्या ताब्यातील दुचाकींचा वापर कामासाठी करीत असतात. दरम्यान आणखी एक चार चाकी वाहनांची नितांत गरज आहे.पोलिसांना कोरोनाच्या पार्श्वभूमिवर संचारबंदीचे काम करावे लागत आहे. त्याचबरोबर सोनगीर व परिसरातील गावांमध्ये शांतता राखण्याचे मोठे आव्हान आहे. पोलिसांवर अतिरिक्त कामाचा ताण तसेच विविध प्रकरणात तपासाचे कामकाज नागरिकांचे तक्रारी निवारण करणे तसेच आदी कामे सुरळीत करण्यात अडचणी येतात. दरम्यान नुकताच उपनिरीक्षक दर्जाचे राजेंद्र पाटील हे सेवानिवृत्त झालेत. या मुळे कामाचा ताण आणखीनच वाढला आहे.