धुळे जिल्ह्यातील जि.प.शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मिळतोय फक्त भात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 03:18 PM2017-11-29T15:18:56+5:302017-11-29T15:20:32+5:30

‘शापोआ’चा ठेका अद्याप दिला नाही, पैसेच मिळत नसल्याने, मुख्याध्यापकांचीही ‘खिचडी’ शिजेना

Only rice is available for the students of ZP schools in Dhule district | धुळे जिल्ह्यातील जि.प.शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मिळतोय फक्त भात

धुळे जिल्ह्यातील जि.प.शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मिळतोय फक्त भात

googlenewsNext
ठळक मुद्देआतापर्यंत मुख्याध्यापकांनीच स्वखर्चाने दिला पोषण आहारमात्र नोव्हेंबर महिन्यांपर्यंत पैसेच न मिळाल्याने, मुख्याध्यापकांचीही क्षमता संपलीविद्यार्थीही रोज भात खाण्यास कंटाळले


लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शैक्षणिक वर्षाचे दुसरे सत्र सुरू झाले असून, अद्याप शालेय पोषण आहाराचा ठेका देण्यात आलेला नाही. त्यामुळे आतापर्यंत मुख्याध्यापकांनीच स्वखर्चानेच शाळेत ‘खिचडी’ शिजवली.  मात्र आता तांदळा व्यतिरिक्त सर्वच साहित्य संपल्याने, जिल्ह्यातील बहुतांश जि.प.शाळांमध्ये विद्यार्थ्यांना फक्त शिजविलेला भातच दिला जात असल्याची माहिती जि.प.शाळेच्या सुत्रांनी दिली आहे. 
केंद्र व राज्य सरकारच्या पुढाकाराने प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजना राबविली जाते. विद्यार्थ्यांना शाळेत भोजन  पुरविण्याची यंत्रणा विकसीत केलेली आहे. शाळेमध्ये आहार शिजविण्यासाठी स्वयंपाकी व मदतनीस नियुक्त  करण्यात येतात.  विद्यार्थी संख्येच्या अनुषंगाने दरवर्षी राज्यशासनाकडून जिल्हा परिषदेला निधी दिला जात असतो. धुळे जिल्ह्यात एकूण ११०३ जिल्हा परिषदेच्या शाळा असून, त्यात ९३ हजार ९८९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 
यावर्षी दुसरे सत्र सुरू झाले तरी शासनस्तरावरून अद्याप धान्य पुरविणाºया ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे आतापर्यंत जि.प.शाळेच्या मुख्याध्यापकांनी पदरमोड करीत  खिचडी शिजविण्यासाठी लागणाºया सर्वप्रकारच्या डाळी, तेल, मीठ, हळद, तिखट, मोहरी, उसळी आदी वस्तू आणून,  विद्यार्थ्यांना नियमित पोषण आहार दिला. मात्र शालेय पोषण आहारासाठी ज्या-ज्या मुख्याध्यापकांनी पैसा गुंतविला त्यांना जुलैपासून  नोव्हेंबरपर्यंत पैसाच मिळालेला नाही. त्यामुळे ते देखील आता ‘शापोआ’साठी खिशातून पैसा टाकण्यास तयार नाहीत. अनेकांची पैसा खर्च करण्याची क्षमता संपलेली आहे. तसेच  अनेक शाळांमधील डाळी, तेल, तिखट, आदी साहित्य संपलेले आहे. साहित्य कोणी आणायला तयार नाही.  त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश जि.प. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना केवळ भात दिला जात आहे.  
दररोज फक्त भात मिळत असल्याने, विद्यार्थीही त्याला कंटाळलेले आहेत. विद्यार्थी रोज-रोज भात खायाला तयार नाहीत. त्यामुळे शिजविलेला भात तसाच पडून राहतो, किंवा जनावरांना घालावा लागतो अशी स्थिती निर्माण झालेली आहे. 
मदतनिसांना मानधन नाही
पोषण आहार शिजविण्यासाठी असणाºया मदतनीसांनाही गेल्या तीन-चार महिन्यांचे मानधन मिळालेले नाही. त्यामुळे मदतनीसही पोषण आहार शिजविण्यास तयार नसल्याचे सांगण्यात आले.
आर्थिक कोंडी होते : रोकडे
गेल्या दोन अडीच महिन्यांपासून शालेय पोषण आहारासाठी स्वखर्चाने साहित्य आणत आहे. मात्र अद्याप त्याचे बिले न मिळाल्याने, आर्थिक कोंडी होत असल्याची प्रतिक्रिया बुरझड (ता.धुळे) जि.प.शाळेचे मुख्याध्यापक मुरलीधर रोकडे यांनी दिली.
बहिष्कार टाकणार: पाटील
शालेय पोषण आहाराचा ठेका येत्या आठ दिवसात न दिल्यास या योजनेवर बहिष्कार टाकला जाईल, असा इशारा शिक्षक समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी दिला आहे. 


 

Web Title: Only rice is available for the students of ZP schools in Dhule district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.