वलवाडीत प्रस्तावित अडीच कोटींच्या रस्त्यांना विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 06:32 PM2018-09-19T18:32:04+5:302018-09-19T18:34:52+5:30
धुळे महापालिकेच्या स्थायी सभेत विषयाला मंजूरी
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहराच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांपैकी वलवाडी येथे अडीच कोटी रूपयांच्या रस्त्यांच्या विषयाला स्थायी समितीच्या सभेत जोरदार विरोध झाला़ नगरसेवक निधी मिळत नसतांना ४ रस्त्यांवर अडीच कोटींच्या उधळपट्टीची गरज काय? असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला़ मात्र कडाडून विरोधानंतर सदस्यांनी नमती भूमिका घेत विषय मंजूर केला़
महापालिकेच्या स्थायी समितीची सभा बुधवारी सकाळी ११ वाजता मुख्य सभागृहात झाली़ सभेला सभापती वालिबेन मंडोरे, उपायुक्त रविंद्र जाधव, नगरसचिव मनोज वाघ यांच्यासह सदस्य जितेंद्र शिरसाठ, दिपक शेलार, गुलाब महाजन, सुभाष खताळ, अमिन पटेल, यमुनाबाई जाधव, नलिनी वाडिले, नुरून्नीसा मकबुल अली उपस्थित होते़ वलवाडी येथे महापालिकेने प्रस्तावित केलेल्या अडीच कोटी रूपयांच्या चार रस्त्यांच्या विषयाला सदस्यांनी कडाडून विरोध केला़ नगरसेवक दिपक शेलार यांनी नगरसेवक निधी देण्यास प्रशासन टाळाटाळ करते़ नगरसेवक निधीचे २० लाखाचे प्रस्ताव नामंजूर केले जात असतांना केवळ एका पक्षाच्या जिल्हाध्यक्षाच्या पत्रावरून अडीच कोटींची कामे प्रस्तावित करण्याची गरज काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला़ परंतु अखेरीस विषय मंजूर करण्यात आला़