मुख्याध्यापिका, अधीक्षकासह सहा कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:28 AM2021-05-30T04:28:04+5:302021-05-30T04:28:04+5:30
धुळे : मोहाडी उपनगर येथील दिव्यांग विद्यार्थी मृत्यूप्रकरणी प्रभारी मुख्याध्यापिका, अधीक्षकासह सहा कर्मचाऱ्यांवर आठ दिवसांच्या आत कारवाई करण्याचे आदेश ...
धुळे : मोहाडी उपनगर येथील दिव्यांग विद्यार्थी मृत्यूप्रकरणी प्रभारी मुख्याध्यापिका, अधीक्षकासह सहा कर्मचाऱ्यांवर आठ दिवसांच्या आत कारवाई करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिले आहेत.
औरंगाबाद येथील सुंदरादेवी अपंग शिक्षण व प्रशिक्षण प्रसारक मंडळ संचलित तातेराव पाटील निवासी मतिमंद विद्यालय मोहाडी उपनगर, ता. धुळे येथे आहे. या विद्यालयात रोहित परेश पवार (रा. अमळनेर) या विद्यार्थ्याचा जुलै २०१९ मध्ये संशयास्पद मृत्यू झाला होता. मृत्युमुखी पडलेल्या मुलाच्या नातेवाइकांनी या प्रकरणाची सखोल चाैकशी करण्याची मागणी दिव्यांग आयुक्तांकडे केली होती. आयुक्तांच्या आदेशानंतर नेमलेल्या चाैकशी समितीने २३ ऑक्टोबर २०२० रोजी अहवाल सादर केला. या अहवालानुसार सदर मुलाच्या बाबतीत दुर्लक्ष झाल्याचा ठपका विद्यालयाच्या सहा कर्मचाऱ्यांवर ठेवला आहे. त्यात परिचारिका ज्योत्स्ना पाटील, मानद वैद्यकीय अधिकारी डाॅ. रमेश बोरसे, विशेष शिक्षिका तथा प्रभारी मुख्याध्यापिका मंदा रमेश इंगळे, अधीक्षक संदीप पंडितराव बडगुजर, काळजीवाहक श्याम प्रकाश पाटील, हेमंत मधुकर गांगुर्डे यांचा समावेश आहे.
आदेशात म्हटले आहे की, दिव्यांग शाळाहचे कामकाज दिव्यांग शाळा संहितेनुसार चालविण्यात येते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर आठ दिवसांच्या आत योग्य ती कार्यवाही करून तसा अहवाल जिल्हा परिषदेला सादर करावा, असे आदेश संस्थेचे अध्यक्ष आणि सचिवांना दिले आहेत. आठ दिवसांच्या आत कारवाई झाली नाही तर कार्यालयीन स्तरावरुन एकतर्फी कारवाई प्रस्तावित केली जाणार आहे.