धुळ्यात शुक्रवारी मराठा क्रांती महामोर्चाचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 05:13 PM2018-01-07T17:13:48+5:302018-01-07T17:14:58+5:30
बैठकीत निर्णय : शिवप्रेमींना मोर्चात सहभागाचे आवाहन, व्यवहार राहणार सुरळीत
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : कोरेगाव-भीमा प्रकरणानंतर धुळयात निघालेल्या मोर्चादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल गलिच्छ घोषणा आणि दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या़ याप्रकरणी दोषींवर कारवाई न झाल्याने मराठा क्रांती मोर्चातर्फे शुक्रवारी १२ जानेवारीला सकाळी ११ वाजता आग्रा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळयापासून महामोर्चा काढण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत घेण्यात आला़ बैठकीस पोलिसांनी परवानगी नाकारली होती.
मराठा क्रांती मोर्चाची बैठक रविवारी इंदिरा उद्यान परिसरात पार पडली़ या बैठकीस राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तथा मराठा क्रांती मोर्चाचे मनोज मोरे, माजी आमदार शरद पाटील, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, राजेंद्र इंगळे, साहेबराव देसाई, राजू महाराज, सुनिल चौधरी, नाना कदम, अॅड़एम़एस़पाटील, अॅड़ सचिन जाधव, निलेश काटे, गौरव पवार, अमोल मराठे, दिपक रवंदळे, अर्जुन मराठे यांच्यासह मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते़ भिमा कोरेगाव प्रकरणानंतर ३ जानेवारीला पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदच्या दिवशी धुळयात मोर्चा काढण्यात आला होता़ या मोर्चादरम्यान दुकानांवर व वाहनांवर दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या़ तसेच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल गलिच्छ घोषणा देण्यात आल्या होत्या़ त्याचप्रमाणे सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान करण्यात आले़ या सर्व प्रकारांचे पुरावे देत मराठा क्रांती मोर्चाने दोषींवर कारवाई करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली होती व कारवाई न झाल्यास प्रतिमोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला होता़ मात्र प्रशासनाकडून कारवाई न झाल्याने शुक्रवारी १२ जानेवारीला महामोर्चा काढण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत घेण्यात आला़
बैठकीस पोलिसांची परवानगी नव्हती - दरम्यान, रविवारी आयोजित बैठकीला पोलीसांनी परवानगी नाकारत दिलेले पत्र बैठकीत फाडून टाकण्यात आले़ तसेच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली