किशोरांमध्ये उस्मानाबाद तर किशोरींमध्ये पुणे अजिंक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 10:34 PM2019-09-22T22:34:53+5:302019-09-22T22:35:20+5:30
श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्था व महाराष्ट्र खो-खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ३६ व्या किशोर किशोरी राज्यस्तरीय निवड चाचणी खो-खो स्पर्धा तालुका क्रिडा संकुल,गरुड मैदान धुळे येथे १९ ते २२ सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली़
धुळे : श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्था व महाराष्ट्र खो-खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३६ व्या राज्यस्तरीय किशोर किशोरी खो- खो निवड चाचणी स्पर्धेत रविवारी झालेल्या अंतिम फेरीत किशोरी गटात पुणे तर किशोर गटात उस्मानाबाद संघाने राज्यअजिंक्यपद पटकावले़
शहरातील गरूड मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यानंतर पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला़ यावेळी माधवराव पाटील, डॉ़एस़टी़पाटील, क़ब़चौ़ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ़दिनेश पाटील, भगवान गवळी, महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, सचिव संदीप तावडे, आयोजन समिती सचिव आनंद पवार, सतीश नाईक, संजय गिरासे नरेंद्र मराठे, गंधाली पलांडे, पवन पाटील, धर्मेंद्र मोहिते, पी़एस़ पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत विजयी उपविजयी संघ व खेळाडूंना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. प्रा़ सदाशिव सूर्यवंशी यांनी सुत्रसंचालन केले संजय गिरासे यांनी आभार मानले.
अंतिम सामना किशोरी गटाचा निकाल
किशोरी गटाचा अंतिम सामना हा नाशिक विरुद्ध पुणे यांच्यात झाला यात पुणे संघाने ५ मिनिटे राखत व एक गुण मिळवत विजय मिळवला पुणे संघातील भाग्यश्री बढे हिस अष्टपैलू खेळाडू, प्रांजली शेंडगे हिस उत्कृष्ट संरक्षण व नासिक संघातील ललिता गोबालेला उत्कृष्ट आक्रमक म्हणून सन्मानित करण्यात आले. अंतिम सामन्यात पंच म्हणून मंदार कोळी, शेखर स्वामी, प्रभाकर काळे, पल्लवी वेंगुर्लेकर यांनी काम पाहिले. पुण्याच्या या विजयी संघास संघव्यवस्थापक प्रियांका भुजबळ आणि प्रशिक्षक अमोल घरत यांचे मार्गगदर्शन लाभले.नाशिकच्या संघ ाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले़
अंतिम सामना किशोर गटाचा निकाल
किशोर गटाचा अंतिम सामना हा पुणे विरुद्ध उस्मानाबाद यांच्यात झाला यात उस्मानाबादचा संघाने ५ मिनिटे राखत व एक गुण मिळवत सलग दुसºयांदा राज्यअजिंक्यपद स्पर्धेत विजय मिळवला उस्मानाबादच्या संघातील भरतसिंग वसावेला उत्कृष्ट संरक्षक, रमेश वसावे यास अष्टपैलू खेळाडू, पुणे संघातील चेतन बिका यास उत्कृष्ट आक्रमक म्हणून सन्मानित करण्यात आले.
सामन्यास पंच म्हणून वीरेंद्र भुवळ, किशोर पाटील, महेश करमरकर यांनी काम पाहिले.
या विजयी संघास संघ व्यवस्थापक प्रवीण बागल व संघ प्रशिक्षक पवन वठावडे यांचे मार्गदर्शन लाभले. पुण्याच्या संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले़