अन्यथा कठोर पावलं उचलणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 10:43 PM2020-08-20T22:43:35+5:302020-08-20T22:44:06+5:30
साक्रीत आढावा बैठक : जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षकांचे सुचक विधान, यंत्रणा अलर्ट
साक्री : साक्री तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता यावर कठोर उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी संजय यादव व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत साक्री येथे आढावा बैठक घेण्यात आली़ या बैठकीत, कोरोना रुग्णांच्या संख्येत अजून वाढ होऊ नये म्हणून कठोरपणे कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी दिले आहेत़
तसेच येत्या १५ दिवसात कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता साक्री येथे एका आठवड्याच्या आत आॅक्सिजन सुविधायुक्त ५० बेड सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत़ तहसील कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीला आमदार मंजुळाताई गावित, पंचायत समितीच्या सभापती प्रतिभा सूर्यवंशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकारी वान्मथी सी यांनी मार्गदर्शन केले.
साक्री तालुक्यात गेल्या एक महिन्यापूर्वी कोरोनाचे अल्प पेशंट होते़ परंतु एका महिन्यात जवळपास ५०० च्या आसपास कोरोना रुग्ण वाढल्याने लोकांमध्ये बेफिकिरी दिसून येत असल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश यावेळेस देण्यात आले़ त्यात बाजारात विना मास्क फिरणारे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे तसेच सोशल डिस्टंसिंग न पाळणाºया लोकांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे़ त्यासोबत विवाह समारंभात किंवा अंत्यविधीत ५० पेक्षा जास्त लोक आढळून आल्यास त्यांच्यावर कोणतीही दयामाया न दाखवता गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत़ यासाठी संबंधित गावाचे पोलीस पाटील, ग्रामसेवक व तलाठी यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे़ अशा कार्यक्रमांची व्हिडिओ शुटिंग करून ती पोलिसांना देण्यात येणार आहे़ कोरोना संदर्भात झालेल्या या बैठकीत लोकप्रतिनिधींनीही आपली मते मांडली़ यामध्ये पंचायत समितीचे उपसभापती अॅड़ नरेंद्र मराठे, साक्री नगरपंचायतचे गटनेते ज्ञानेश्वर नागरे, शिवसेनेचे पंकज मराठे, नितीन बेडसे, आदींनी आपले मते मांडली़ यावेळेस डॉ़ तुळशीराम गावित, तहसीलदार प्रवीण चव्हाणके, गटविकास अधिकारी जी़ टी़ सूर्यवंशी, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी बिडकर, तालुका आरोग्य अधिकारी साळुंके, साक्री पिंपळनेर निजामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी, आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते़
कोरोना संकटाच्या मुकाबला करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी यात सहभागी होऊन येत्या पंधरा दिवसापर्यंत अतिशय काळजी घेणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे़ साक्री शहरात नगरपंचायत असून कठोर अंमलबजावणी करत बाजारात होणारी गर्दी नियंत्रणात आणावी नियमाचे पालन न करणाºया नागरिकांवर ही गुन्हे दाखल करण्यात यावेत असेही आदेश देण्यात आले आहेत.