वातावरणातील बदलांमुळे पिकांवर कीड, रोगांचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 01:35 PM2020-10-08T13:35:27+5:302020-10-08T13:35:46+5:30
ुजिल्हा : धुक्यामुळे पिकांची फुल गळण, उत्पादनात घट येण्याची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : मध्येच ढगाळ वातावरण, अवेळी कोसळणारा पाऊस, मध्येच कडक ऊन्ह यासारख्या बदललेल्या वातावरणाचा मानवाच्या प्रकृतीवर परिणाम होतो, तसा पिकांवरही होत आहे. बदलत्या वातावरणांमुळे पिकांवर कीड, रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे उत्पादनात घट येते असे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तर दवबिंदूचा रब्बीच्या पिकांना फायदा होतो असे कृषी अधिकाऱ्यांचे मत आहे.
कृषी विभागाच्या नियोजनानुसार यावर्षी सुमारे साडेचार लाख हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली. सुरवातीपासूनच पावसाची पिकांना आवश्यक असल्यावेळी हजेरी लागत असल्याने, पिकांची स्थितीही उत्तम होती. मात्र आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात व सप्टेंबरच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये झालेल्या पावसामुळे खरीपाच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. आता वातावरणात बदल होवू लागला आहे. भाद्रपदात कडक उन्ह पडण्याऐवजी ढगाळ वातावरण, पाऊस होता. तर आता दिवसा ‘आॅक्टोबर हिट’ जाणवत असून, रात्री थंडावा असतो. तर पहाटेच्यावेळी धुकेही पडत आहे.
या बदलत्या वातावरणाचा मानवी प्रकृतीप्रमाणेच पिकांवरही होवू लागला आहे. आर्द्रता ७०-८० टक्याच्यावर गेल्यानंतर पिकांवर कीड, विविध रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. तर धुक्यामुळे कापसाची फुलगळ होते. पिकांच्या वाढीसाठी समप्रमाणात उष्णतेची गरज असते. मात्र बदलत्या वातावरणामुळे उत्पादन क्षमताही घटण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अगोदरच अतिवृष्टीमुळे खरीपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यातच आता बदलत्या वातावरणाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतो आहे.