अनलॉकमध्ये नियमांचे सर्रास उल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 10:21 PM2020-08-18T22:21:28+5:302020-08-18T22:24:28+5:30
‘कोरोना’ची ऐशी-तैशी : मास्क न वापरताच वाढतोय वावर, कारवाई करायलाच हवी
धुळे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु असताना मात्र नागरिकांकडूनच नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे समोर आले आहे़ रिक्षात किती प्रवासी असावेत, दुचाकीवर किती याचे नियम लावून दिलेले असतानांना त्याकडे कानाडोळा करुन बिनधास्तपणे वावर सुरु आहे़ याकडे पोलिसांनी लक्ष देवून कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे़
कोरोनाच्या अनुषंगाने संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आलेला होता़ त्यात अत्यावश्यक सेवा सुविधा वगळण्यात आलेल्या होत्या़ जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी नागरीकांना सूट देण्यात आलेली होती़ त्याचा काही जण गैरफायदा घेताना दिसत आहे़ असे असताना काही जण दुचाकी घेऊन किराणा किंवा अन्य काही वस्तू घेण्याचा खोटा बहाणा करत असतात आणि विनाकारण घराबाहेर पडतात असे देखील दिसून येत आहे़ लॉकडाऊनच्या काळात कितीतरी प्रमाणात निर्बंध लावण्यात आले होते़ त्या तुलनेत अनलॉकच्या काळात त्यात सुट दिली असलीतरी काही नियम पाळणे बंधनकारक करण्यात आले आहेत़ मात्र, त्या नियमानुसार न वागता बिनधास्तपणे आणि कोणाचीही मुलाईजा न बाळगता अनेकांचा वावर असल्याचे समोर येत आहे़
रिक्षामध्ये अधिक प्रवाशी
रिक्षांना बंदी घालण्यात आली होती़ आता ही बंदी उठविली असलीतरी त्यात किमान किती प्रवासी असावेत असे काही निर्बंध आहेत़ त्याची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता असताना मात्र त्याकडे रिक्षाचालकांकडून दुर्लक्ष होत असल्याचे समोर येत आहे़ रिक्षांमध्ये किमान दोन प्रवासी आणि चालक इतकेच बसलेले असावेत़ असे असताना रिक्षामध्ये मागे तीन आणि चालकाच्या शेजारी एक असे प्रवासी प्रवास करताना काही ठिकाणी दिसत आहेत़ यांच्यावर कारवाई होणार का, हा प्रश्न आहे़
ट्रीपल सीटचा प्रवास
दुचाकीवरुन शहरात प्रवास करीत असताना किमान एक अथवा दोन जणं असताना मात्र तीन जणांकडून प्रवास होताना काही ठिकाणी दिसून येत आहे़ यात मुली देखील मागे राहिलेल्या नाहीत़ ट्रीपल सीट प्रवास करु नये, अपघाताचा धोका संभवू शकतो, असे असताना सर्रासपणे ते ही गर्दीच्या चौकातून बिनधास्तपणे ट्रीपल सीटचा प्रवास सुरु असल्याचे दिसत आहे़ संबंधितांवर कारवाईची मागणी जोर धरु लागली आहे़
अडीच लाखांवर दंड
शहरात अधिक प्रवासी घेऊन फिरणाऱ्या रिक्षा आणि ट्रीपल सीट दुचाकीस्वार असे मिळून १ हजार २५२ वाहनधारकांकडून २ लाख ५० हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती शहर वाहतूक शाखेकडून देण्यात आली आहे़ कारवाईचे सत्र वेळोवेळी सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले़
शहर वाहतूक शाखेकडून वेळोवेळी कारवाई सुरु आहे़ ट्रिपल सीट आणि रिक्षांवर अधिक प्रवासी बसून प्रवास करीत असतील तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुरु आहे़ संबंधित वाहनधारकांनी नियमांचे पालन करायला हवे़
- राजकुमार उपासे,
पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा, धुळे