थकबाकीदार मनपाच्या ‘रडार’वर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 10:30 PM2019-12-23T22:30:36+5:302019-12-23T22:30:55+5:30
जप्तीची मोहीम लवकरच : विभाग प्रमुखांसह कर्मचाऱ्यांचीही असणार विविध पथक
धुळे : महानगर पालिका प्रशासनाच्यावतीने शहरातील थकबाकीदारांवर जप्तीच्या कारवाईची विशेष मोहीम लवकरच राबविण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली़ दरम्यान, १० कोटी ३३ लाखांच्यावर थकबाकीची रक्कम असल्याचे सांगण्यात आले़
नगरपालिकेचे महानगर पालिकेत रुपांतर झाले़ शहराचाही विस्तार तसा वाढतच गेला़ शहराच्या चारही बाजुंनी मालमत्ता वाढत गेल्या आहेत़ त्यातील बºयाच जणांनी त्यांच्या मालमत्तेची नोंदणी प्रशासनाकडे केली़ आपल्याकडील थकबाकी देखील भरली़ असे असलेतरी बहुसंख्य जणांनी आपल्याकडील थकबाकी प्रशासनाकडे भरलेली नाही़ त्यांच्या माहितीचे संकलन करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु झाले आहे़
१ लाखांच्यावर ‘लक्ष’
महापालिकेकडून नियमित मालमत्ता कर भरणारे आणि थकबाकीदारांच्या नावांच्या यादीचे संकलन करण्याचे काम सुरु आहे़ थकबाकीदारांच्या मालमत्तेची जप्ती करण्यापुर्वी सुरुवातीच्या काळात १ लाख आणि १ लाखांच्या वर असलेल्या मालमत्ताधारकांच्या नावांचा विचार प्रशासनाकडून केला जात आहे़ त्यामुळे प्राथमिक स्तरावर अशांच्या नावांच्या यादीचे संकलन केले जात आहे़
पथकाची होणार नियुक्ती
महापालिकेकडून सुरुवातीला १ लाख आणि १ लाखांच्या वर असलेल्या थकबाकीदारांकडून थकबाकीची रक्कम गोळा करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आल्यामुळे त्याच्या वसुलीसाठी विशेष पथकासह विभाग प्रमुख आणि त्यांच्या सोबत काही कर्मचारी असे काही पथक तयार करण्यात येणार आहेत़ त्याचेही नियोजन आखले जात आहे़
आकडेवारीची जुळवा जुळव
महापालिका हद्दीत किती मालमत्ताधारक आहेत, त्यातील किती नियमित कर भरणारे आणि थकबाकीदार किती, कोणाकडे किती रकमेची थकबाकी आहे, यासंदर्भात असलेल्या माहितीची अर्थात आकडेवारीची जुळवा जुळव आणि नावाची माहिती संकलित केली जात आहे़ या कामांसाठी मालमत्ता कर विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची मदत घेतली जात आहे़ कर्मचाºयांना नेमून दिलेल्या त्या त्या विभागांची माहिती त्यांच्याकडून संकलित केली जात आहे़ त्या माध्यमातून कोणाकडे किती रकमेची थकबाकी आहे, याची आकडेवारी गोळा होण्यास मदत मिळत आहे़
नळ कनेक्शनही तोडणार
थकीत मालमत्ताधारकांवर कारवाईचे अस्त्र उगारण्याचे काम सुरु होत असतानाच त्यांचे नळ कनेक्शन तोडले जाण्याचे संकेत मिळू लागले आहेत़ अशांना १५ जानेवारीपर्यंतची अंतिम डेडलाईन देण्यात आलेली आहे़ त्यांनी या तारखेपर्यंत आपल्याकडील नळाची रखडलेली रक्कम भरणे त्यांना क्रमप्राप्त ठरणार आहे़ संबंधितांनी त्यांच्याकडील थकबाकी ही भरावी़ अन्यथा, नळकनेक्शन तोडण्यात येणार आहे़ तसेच तोडण्यात आलेले नळकनेक्शन पुन्हा त्याच्या जोडणीसाठी ५ हजारांचा दंड भरणे आवश्यक राहील़ तर त्यांचे नळकनेक्शन पुन्हा जोडण्यात येईल़
मोबाईल टॉवरवरही होणार कारवाई
शहरातील विविध भागांमध्ये मोबाईल कंपन्यांनी आपल्या टॉवरची उभारणी केली आहे़ दरवर्षी संबंधित मालमत्ताधारकांनी त्याचाही कर महापालिकेकडे भरणे आवश्यक आहे़ मात्र, असे कितीतरी मोबाईलचे टॉवरधारक आहेत त्यांच्याकडून मालमत्ता कर नियमित भरण्यात आलेला नाही़ या अनुषंगाने अशाही थकीत टॉवरची माहिती संकलित केली जात असून असे जवळपास ९९ असल्याचे प्राथमिक स्तरावर समोर आले आहे़ त्यांच्यापर्यंत थकीत रक्कम भरण्यासंदर्भात प्रशासनाकडून वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आलेला आहे़ मात्र, योग्य असा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे संबंधितांवर कारवाईचे अस्त्र उगारण्यात येणार आहे़
थकबाकीची वर्गवारी
थकबाकी - ४ कोटी ६१ लाख
चालू मागणी - २ कोटी १० लाख
शास्ती - ३ कोटी ६२ लाख
एकूण - १० कोटी ३३ लाख