धुळे जिल्ह्यातील १२०विस्थापित शिक्षकांची झाली बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 12:03 PM2019-06-29T12:03:55+5:302019-06-29T12:04:46+5:30
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत समुपदेशन
आॅनलाइन लोकमत
धुळे : जिल्हांतर्गत बदलीने २०१९ मध्ये विस्थापित झालेले तसेच २०१७ व २०१८ मधील विस्थापित असे एकूण १२० शिक्षकांचे इनकॅमेरा समुपेदशन करण्यात येऊन त्यांना शुक्रवारी सायंकाळी कार्यमुक्ततेचे आदेश देण्यात आले. या विस्थापित शिक्षकांना शनिवारपासून नवीन शाळेत हजर व्हावे लागणार आहे.
जिल्हा परिषदेच्या ३५० प्राथमिक शिक्षकांच्या १५ जून १९ रोजी जिल्हांतर्गत बदल्या झाल्या. या बदली प्रक्रियेत ५५ शिक्षक विस्थापित झाले होते. तर २०१७ मध्ये ११ शिक्षक न्यायालयात गेले होते त्यांच्या व २०१८ मधील राऊंड पाच व सहा मधिल शिक्षकांचे समुपदेशन करण्यासाठी शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर शिक्षण सभापती नूतन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन डी., प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी मनीष पवार उपस्थित होते.
दुपारी १२ वाजता समुपदेशनाची प्रक्रिया सुरू झाली. यावेळी २०१७ मध्ये न्यायालयात गेलेले ११, २०१८ मधील राऊंड पाचमधील तीन व राऊंड सहामधील ६२ तसेच २०१९मधील ४४ अशा एकूण १२० शिक्षकांचे समुपदेशन करण्यात आले. या विस्थापित शिक्षकांना एका मोठ्या पडद्यावर रिक्त जागा दाखविण्यात आल्या. त्यांच्या पसंतीनुसार शिक्षकांना गावे देण्यात आली. अवघ्या दीड तासात ही प्रक्रिया पूर्ण पार पडली. समुपदेशन झालेल्यांमध्ये महिला ३२ व पुरूष शिक्षक ८८ आहेत.
शिक्षकांना कार्यमुक्ततेचे आदेश
दरम्यान या विस्थापित शिक्षकांना शुक्रवारीच कार्यमुक्ततेचे आदेश देवून त्यांना शनिवारी नवीन शाळेवर हजर व्हावे लागणार आहे.
विस्थापित शिक्षकांच्या समुपदेशनाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी शिक्षण विभागातील कार्यालय अधीक्षक रवींद्र देवरे, रंजना साळुंखे, दिलीप शिंदे, वरिष्ठ सहायक मंगेश राजपूत, निनाद मोरे, अनिल बेडसे, तुषार बैसाणे यांनी परिश्रम घेतले.