धुळे जिल्ह्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 11:58 AM2018-08-17T11:58:16+5:302018-08-17T12:00:25+5:30
नदी-नाल्यांना पूर, साक्री तालुक्यातील २ धरणे ‘ओव्हरफ्लो’
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्ह्यात गुरुवारी सर्वदूर जोरदार पाऊस झाला. संध्याकाळनंतर पावसाचा जोर वाढला. रात्री तो उत्तरोत्तर वाढत गेला. यामुळे शेतीची तहान भागली असून पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे साक्री तालुक्यातील पांझरा (लाटीपाडा), जामखेडी ही दोन्ही मोठी धरणे ‘ओव्हरफ्लो’ झाली. तर जिल्ह्यातील अन्य नदी-नाल्यांनाही पूर आले आहेत. दरम्यान शिंदखेडा तालुक्यात रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे नाल्यास आलेल्या पुरामुळे बैलगाडी वाहून गेली. दोघा बैलांचा मृत्यू झाला असून गाडी वाहून गेल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे सांगण्यात आले. साक्री तालुक्यात वार्सा, उमरपाटा, दहीवेल आदी ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सलग दुस-या दिवशी सूर्यदर्शन झाले नाही.
जिल्ह्यात तब्बल २२ दिवसांच्या खंडानंतर पावसाचे आगमन झाले. गुरूवारी पहाटेपासून रिमझिम पावसाला सुरूवात झाल्याने दिवसभर सूर्यदर्शनही झाले नाही. दिवसभर रिमझिम पावसाची रिपरिप सुरू होती. संध्याकाळनंतर मात्र पावसाचा जोर वाढला. धुळे, शिरपूर, शिंदखेडा व साक्री तालुक्यात सर्वदूर जोरदार पाऊस सुरू झाला. यामुळे बहुतांश गावांचा वीजपुरवठा खंडीत झाला होता. धुळे शहरातही बहुतांश भाग अंधारात बुडाला होता. काही ठिकाणी रात्री वीजपुरवठा सुरू झाला. तर ब-याच ठिकाणी रात्रभर तो खंडीत राहिला.
साक्री तालुक्यातील कान, बुराई या नद्यांना रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठा पूर आला आहे. या शिवाय अनेक नाल्यांनाही पूर आला. शिंदखेडा तालुक्यात नाला ओलांडताना अचानक आलेल्या पुरामुळे बैलगाडी वाहून गेली. पुरात बुडून दोन्ही बैलांचा मृत्यू झाला. तर गाडी पुरात वाहून गेल्याचे सांगण्यात आले.
या पावसामुळे सर्व खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र मूग, उडीद ही पिके पावसाच्या मोठ्या खंडामुळे वाया गेली आहेत. कपाशीला या पावसाचा जास्त फायदा होणार असून मका, ज्वारी व बाजरी यांच्या उत्पादनात मात्र घट होणार आहे. रब्बी हंगामासाठी मात्र या पावसाचा फायदा होईल, असे कृषीतज्ञांचे मत आहे. ज्या भागात अतिवृष्टी झाली तेथील कांद्याचे पीक वाहून गेल्याने नुकसान झाल्याचे वृत्त आहे.