प्रचाराचे साहित्य डकविण्यापूर्वी मालकाची परवानगी घेणे आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 12:06 PM2019-03-31T12:06:43+5:302019-03-31T12:07:38+5:30
घोषणापत्र अनिवार्य : अपर जिल्हा दंडाधिकाऱ्यांची माहिती
धुळे : महाराष्ट्र मालमत्तेच्या विरुपणास प्रतिबंध अधिनियमानुसार भिंती लेखन आणि पोस्टर्स लावणे, खासगी परिसरातील मालमत्तेवर होर्डिंग्ज, बॅनर, झेंडे इत्यादी ठेवणे किंवा लावण्यास संबंधित खासगी मालमत्ताधारकांकडून पूर्व लिखित परवानगी घेणे आवश्यक आहे, असे कायदा व सुव्यवस्था विभागाचे नोडल अधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी संजय गायकवाड यांनी कळविले आहे.
भारत निवडणूक आयोगाने १०मार्चपासून लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू केली असून धुळे लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर खासगी मालमत्ताधारकाची लिखित परवानगी घेतल्याशिवाय कोणतेही भिंती लेखन, पोस्टर पेस्ट करणे, खासगी होर्डिंग्ज, बॅनर, झेंडे इत्यादी ठेवता किंवा लावता येणार नाहीत. यासह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उपविधीतील तरतुदीनुसार परवानगी घेणे आवश्यक आहे. याबाबतीत होणारा खर्च उमेदवाराच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करणे बंधनकारक राहणार असल्याचे गायकवाड यांनी नमूद केले आहे.
घोषणापत्र अनिवार्य
निवडणूक कालावधीत प्रचारार्थ जे फलक लावायचे आहेत, असे फलक मुद्रीत केलेले मुद्रक व प्रकाशकांची नावे प्रतींच्या संख्येसह मुद्रकाने छपाई केलेल्या दिनांकापासून तीन दिवसांच्या आत घोषणापत्रासह जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ चे कलम १२७ ए नुसार दाखल करणे अनिवार्य आहे. उमेदवाराने किंवा त्याच्या पक्षाने या बाबींसाठी केलेला खर्च हा निवडणूक खर्चात समाविष्ट करणे बंधनकारक राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
सर्व संबंधित पक्षांचे पोस्टर, प्लेकार्ड, बॅनर, ध्वज (झेंडे) आदी प्रदर्शित करणे किंवा सार्वजनिक मालमत्तेवर विनापरवाना डकविणे, चिटकविण्यास उमेदवारांना तसेच संबंधित राष्ट्रीय, राज्यस्तरीय पक्षांना प्रतिबंधित करण्यात आले आहे, असेही अपर जिल्हादंडाधिकारी गायकवाड यांनी प्रसिद्धीपत्रान्वये कळविले आहे.