रेशनच्या दोन दुकानांचा पंचनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 10:01 PM2020-04-21T22:01:55+5:302020-04-21T22:02:14+5:30
कापडणे : दुकानदारांची ग्राहकांना अरेरावीची भाषा, जास्तीचे पैसे घेतल्याची तक्रार
लोकमत न्यूज नेटवर्क
कापडणे : येथील रेशन दुकानांमध्ये पुरवठा विभागाकडून धान्याचा पुरवठा होवूनही दुकानदारांनी कोणालाही धान्य वाटप केले नाही. काही दुकानदारांनी ग्राहकांना अरेरावीची भाषा केली तर काहींनी जास्ती पैसे घेतल्याची तक्रार ग्राहकांनी केली. याबाबत सोनगीर मंडळ अधिकाऱ्यांनी रेशन दुकानाला भेट दिली. तर दोन दुकानांचा पंचनामा केला.
लॉकडाऊन झालेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी शासनाने रेशनवर धान्य उपलब्ध करून दिले आहे. मात्र येथील रेशन दुकानदार ग्राहकांशी बेजबाबदार वागत असल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे.
तसेच ग्राहकांशी अरेरावीने बोलून जास्तीचे पैसे घेऊन त्यांना पावती न देता रेशन वाटप केले जाते अशीही तक्रार आहे. रेशन दुकानदारांबाबत ग्राहकांनी सोनगीर मंडळ अधिकारी आर.बी. राजपूत यांनी लक्षात आणून दिली. त्यानुसार १९ रोजी महसूल विभागाच्या पथकाने कापडणे येथील रेशन दुकानास भेट दिली. यात दुकान क्रमांक १६७ मध्ये सावळागोंधळ आढळून आला. तसेच या पथकाने गावातील रेशन दुकान क्रमांक ४५ ला भेट देवून तेथीलही पंचनामा केला.
पंचनामा तलाठी विजय बेहरे, धनुरचे तलाठी जितेंद्र चव्हाण, सोनगीर तलाठी एच.आर. सोनवणे, कोतवाल रवींद्र भांमरे, कोतवाल शरद माळी यांच्या पथकाने केला. याप्रसंगी नवल नामदेव पाटील, पंचायत समिती सदस्य राजेंद्र बाबुराव पाटील, जगन्नाथ पाटील, जिजाबराव माळी, विठोबा माळी उपस्थित होते. सदर दुकानदारां विरोधात प्रशासन कोणते पाऊल उचलते याकडे लक्ष लागून आहे.