पांझरा चौपाटी नियमानुकूल करणारच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2017 11:27 PM2017-03-09T23:27:27+5:302017-03-09T23:27:27+5:30
अनिल गोटे : प्रस्तावित कारवाईस महसूलमंत्र्यांची स्थगिती, १ एप्रिलला होणार सुनावणी, चौपाटीवर आनंदोत्सव
धुळे : शहरातील पांझरा चौपाटीवर १० मार्चला जिल्हा प्रशासनाकडून न्यायालयाच्या आदेशाने कारवाई करण्यात येणार होती़ मात्र पांझरा नदीकाठावरील चौपाटी नियमानुसार अनुज्ञेय आहे़ त्यामुळे महसूलमंत्र्यांनी चौपाटीवरील स्टॉलधारकांच्या रिव्ह्यू पिटिशनची १ एप्रिलला महसूलमंत्र्यांकडे सुनावणी असून शुक्रवारी होणाºया कारवाईला स्थगिती मिळाल्याचे आमदार अनिल गोटे यांनी चौपाटीवर पत्रकार परिषदेत जाहीर केले़ चौपाटी नियमानुकूल करणारच, अशी स्पष्टोक्तीही आमदार गोटे यांनी केली़
शहरातील पांझरा चौपाटीबाबत न्यायालयाने चौपाटीवर कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याने जिल्हा प्रशासनाने चौपाटीवर २६ स्टॉलधारकांना नोटिसा बजावून ९ मार्चपर्यंत स्टॉल्स स्वत:हून काढून घेण्याचे आदेश दिले होते़ त्यानुसार गुरुवारी नोटिसीची मुदत संपुष्टात आल्याने पांझरा चौपाटीचे काय होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागून होती़ प्रशासनाने कारवाईसाठी आवश्यक पूर्वतयारी केली होती़
आमदार गोटेंची पत्रकार परिषद!
आमदार अनिल गोटे यांनी रात्री आठ वाजता चौपाटीवर पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली़ ड वर्ग महापालिकांमध्ये १ नोव्हेंबर २०१६ पासून नवीन बांधकाम नियमावली लागू झाली आहे़ त्यातील २२़३ च्या कायद्यात असलेल्या तरतुदीनुसार, लाल व निळ्या पूररेषेच्या आत पक्के बांधकाम करता येणार नाही, मात्र खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, भाजी मार्केट, फॅशनस्ट्रीट उभारता येईल़ त्यामुळे देवपूर सर्व्हे क्रमांक १३ अ हा पूर्णत: शासकीय मालकीचा असून तो बागेसाठी राखीव आहे़ त्यामुळे विकास योजनेतील बगिचा आरक्षणात स्टॉल्सचा वापर काही शर्ती व अटींना अधीन राहून काही प्रमाणात अनुज्ञेय आहेत, असे गोटे म्हणाले़ महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या चौपाटीबाबत आदेशानंतर विहित कालावधीत रिव्ह्यू पिटिशन पांझरा चौपाटी स्टॉल ओनर्स सोसायटीतर्फे दाखल करण्यात आले असून त्यावर १ एप्रिलला सुनावणी असल्याचे आमदार गोटे पत्रकार परिषदेत म्हणाले़ महसूलमंत्र्यांनी जिल्हाधिकाºयांना चौपाटीवरील कारवाई थांबवावी, असे आदेश दिल्याचे गोटे यांनी स्पष्ट केले़ स्टॉलधारकांकडून केवळ चौपाटीच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च घेत असून त्यासाठी स्वतंत्र नोकर लावले आहेत़ पांझरा चौपाटी स्टॉल ओनर्स सोसायटीचे संपूर्ण आठ वर्षांचे लेखापरीक्षणदेखील केले असल्याचे आमदार गोटे यांनी सांगितले़
कायकर्त्यांचा जल्लोष!
आमदार गोटे यांनी चौपाटीवरील कारवाई टळल्याचे जाहीर केल्यानंतर लोकसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी चौपाटीवर फटाक्यांची आतषबाजी केली व पेढे वाटून आनंद व्यक्त केला़ तसेच डफाच्या तालावर नृत्यही केले़
लोकसंग्रामचे धरणे!
पांझरा चौपाटीवरील प्रस्तावित कारवाईच्या पार्श्वभूमीवर लोकसंग्रामचे कार्यकर्ते व चौपाटीवरील स्टॉलधारक कुटुंबासह चौपाटीवर धरणे आंदोलनास बसले़ या वेळी चौपाटीच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या़ शुक्रवारपर्यंत धरणे आंदोलन सुरू राहणार असल्याचे सांगत याच ठिकाणी खिचडी शिजवून जेवण करण्यात आले़ चौपाटीवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ गोटे यांची पत्रकार परिषद होईपर्यंत लोकसंग्रामचे पदाधिकारी, कार्यकर्ते चौपाटीवर बसून होते़