पालकांनी पाल्याचा कल लक्षात घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 11:32 AM2019-02-26T11:32:56+5:302019-02-26T11:34:08+5:30
जानकीबाई देशपांडे वाचनालयातर्फे बक्षीस वितरण
आॅनलाइन लोकमत
धुळे : पालकांनी आपल्या पाल्याच्या कल लक्षात घेऊन त्याला त्याच्या विषयातील शिक्षण कशा रीतीने प्राप्त होऊ शकेल याकडे लक्ष दिले पाहिजे असे मत ज्येष्ठ विधिज्ञ जे.टी.देसले यांनी येथे व्यक्त केले.
जानकीबाई देशपांडे वाचनालयाच्यावतीने आयोजित स्पर्धाच्या ३९ व्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमात सत्कारर्योत्तेजक सभेचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद चितळे यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
जानकीबाई देशपांडे वाचनालयातर्फे वर्षभरात सूर्यनमस्कार, मनाचे श्लोक, चित्रकला, योगासन, पाठांतर या स्पर्धा सांघिक व वैय्यक्तिकस्तरावर घेण्यात आल्या. त्यातील १४० विजेत्यांना मान्यवरांच्याहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
अॅड. देसले म्हणाले की, विद्यार्थी, तसेच सैनिकांना शासनाने अधिक सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे. कारण हेच आपल्या देशाचे भविष्य आहेत. विद्यार्थ्यांनी प्रयत्नात सातत्य ठेवावे, अपयश मिळाले तरी खचून न जाता पुन्हा प्रयत्न करा असा सल्ला दिला. यशस्वी होण्यासाठी माजी राष्टÑपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे तसेच क्रिकेट खेळाडू सचिन तेंडुलकर यांचे त्यांनी उदाहरण दिले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. विवेकानंद चितळे म्हणाले, एखादे कार्य सातत्याने करायचे असेल तर चिकाटी असली पाहिजे. चिकाटी ठेवली तर यश निश्चित मिळते. विद्यार्थ्यांना त्यांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. सांघिक स्पर्धेत प्रथम आलेल्यांना फिरती ढाल तर वैय्यक्तिक स्पर्धेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह आणि पुस्तक भेट देण्यात आले.
प्रास्ताविक वाचनालयाचे अध्यक्ष व.रा.जोशी यांनी केले. स्पर्धेचा अहवाल वाचन कार्यवाह सतीष दीक्षित, पाहुण्यांचा परिचय मंदिराचे कार्याध्यक्ष प्रा.देवेंद्र डोंगरे तर सूत्रसंचालन राजश्री शेलकर यांनी केले. यावेळी विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.