स्थानकात बस लावूनही प्रवासी येईनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:26 AM2021-05-31T04:26:23+5:302021-05-31T04:26:23+5:30
धुळे-नंदुरबार जिल्ह्याच्या मध्यवर्ती दोंडाईचा बसस्थानक आहे. नेहमी वर्दळ असलेले दोंडाईचा बसस्थानक कोरोनाकाळात निर्मनुष्य दिसत आहे. बसफेऱ्या बंद झाल्याने गेल्या ...
धुळे-नंदुरबार जिल्ह्याच्या मध्यवर्ती दोंडाईचा बसस्थानक आहे. नेहमी वर्दळ असलेले दोंडाईचा बसस्थानक कोरोनाकाळात निर्मनुष्य दिसत आहे. बसफेऱ्या बंद झाल्याने गेल्या दीड वर्षांपासून प्रवासी वाहतुकीला ओहोटी आली असून त्याचा परिणाम आगाराच्या उत्पन्नावर झालेला आहे. कोरोनामुळे प्रवासी फिरकत नसले, तरी ज्यांना बाहेरगावी जाणे गरजेचे आहे, त्यांनाही बस नसल्याने बाहेरगावी जाणे शक्य होत नाही. त्यामुळे गरजू प्रवाशांची गैरसोय होत आहे.
दरम्यान, दोंडाईचा बसस्थानकातून दररोज सकाळी व दुपारी धुळे येथे जाण्यासाठी बस लावली जाते. शुक्रवारी व शनिवारी बसस्थानकाला भेट दिली असता एकही प्रवासी आला नाही. सकाळी ७.३० व दुपारी १.३० वाजता धुळ्यासाठी बस लावण्यात आली. चालक-वाहक बसस्थानकात थांबून होते. परंतु, एकही प्रवासी आला नाही. २० प्रवासी आले तरी बस जाणार होती, परंतु प्रवासी न आल्याने बस आगारात जमा करण्यात आली.
कोरोना संसर्गाचा फटका दोंडाईचा आगाराला बसला आहे. प्रवासी वाहतुकीचे उत्पन्न नसल्यात जमा आहे. पार्सल सेवा थंडावली आहे. दररोजचा लाखो रुपयांचा तोटा होत आहे. उत्पन्नात घट आली असून कर्मचाऱ्यांचे पगार होण्यास अडचण आली आहे.
दोंडाईचा आगारात ५९ बसेस आहेत. सुमारे ९० वाहक व ९२ चालक आहेत. ग्रामीण भागासह शहरी भागात २६६ बसफेऱ्या संचारबंदीअगोदर होत होत्या. आता सर्वच बस आगारात पडून आहेत. २६६ फेऱ्या बंद असल्याने किमान ५० लाख रुपयांच्या उत्पन्नावर पाणी फिरले आहे.