धुळ्यात ‘शिवशाही’साठी प्रवाशांना धरले जाते वेठीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 11:26 AM2018-03-12T11:26:39+5:302018-03-12T11:26:39+5:30
नाशिकसाठी बायपास साधी बस लवकर लागत नाही : प्रवाशांना ताटकळत राहावे लागते
आॅनलाइन लोकमत
धुळे : प्रवाशांच्या सोयीसाठी लांब पल्ल्यासाठी सुरू केलेल्या ‘शिवशाही’ बसचे अनेक प्रवाशांनी स्वागत केले. मात्र नाशिकसाठी सुरू केलेली बायपास ‘शिवशाही’ बसचे प्रवासी पूर्ण झाल्याशिवाय साधी (लाल) बस लागतच नसल्याने, प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. उत्पन्नवाढीसाठी एस.टी. महामंडळ एकप्रकारे प्रवाशांना वेठीस धरत असल्याचा प्रवाशांचा आरोप आहे.
‘शिवशाही’ सोबतच ‘परिवर्तन’ ची बससेवाही सुरळीत ठेवावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.
खासगी बससेवेच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी एस.टी. महामंडळाने विविध मार्गावर अत्याधुनिक, वातानुकूलित अशी ‘शिवशाही’ बससेवा सुरू केली. मुंबई, पुण्यासाठी ही वातानुकूलित बससेवा सुरू झाल्याने, प्रवाशांनी या बससेवेचे स्वागत केले. ‘शिवशाही’मुळे खासगी बसकडे गेलेला प्रवासी पुन्हा महामंडळाच्या बसकडे आकर्षिला गेला.
नाशिकसाठी सक्ती नको
या परिसरातून नाशिकला जाण्यासाठी थेट रेल्वेसेवा नसल्याने प्रवासी बसनेच प्रवास करीत असतात. प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता, महामंडळाने पाच वर्षांपूर्वी मालेगाव बायपास धुळे-नाशिक बससेवा सुरू केली. सुरवातीला वाहकासह जाणाºया या बसला प्रचंड प्रतिसाद मिळू लागला. नंतर ही बस विनावाहक धावू लागली. अवघ्या तीन तासात ही बस नाशिकला जात असल्याने, तसेच गाडीत जागा मिळविण्यासाठी कटकट नसल्याने प्रवाशांचा ‘बायपास’ला चांगला प्रतिसाद मिळू लागला. यात नाशिक व धुळे आगाराच्या प्रत्येकी २७-२७ फेºया होत होत्या. अर्ध्या-अर्ध्या तासाने नाशिकसाठी बायपास बस उपलब्ध होत होती.
मात्र आता महामंडळाने या मार्गावर ‘शिवशाही’ बायपास बस सुरू केली. यासाठी साध्या बसच्या काही फेºया रद्द करण्यात आल्या आहेत. या बसला प्रवाशांचा विरोध नाही. मात्र सक्तीला विरोध आहे.
प्रवासी भाड्यात तफावत
एक शिवशाही बस व एक परिवर्तन (लाल) बस असे धुळे आगाराचे नियोजन आहे. मात्र ‘शिवशाही’ व परिवर्तन बस यांच्यातील प्रवासी भाड्यात मोठी तफावत आहे. ‘शिवशाही’साठी नाशिकचे भाडे २६४ रुपये आकारण्यात येत. तेच साध्या बससाठी १७६ रुपये लागतात. म्हणजे दोन बसच्या प्रवासी भाड्यात थोडी-थोडकी नव्हे तर ८८ रुपयांची तफावत आहे. ही तफावत प्रवाशांना रूजलेली नाही.
प्रवाशांना ताटकळत राहावे लागते
बायपास शिवशाही बसचे प्रवासी पूर्ण झाल्याशिवाय दुसरी लाल बस बायपास स्थानकात लागत नाही. त्यामुळे प्रवाशांना तासन्तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. अनेकांना वेळेत नाशिकला पोहचायचे असते. मात्र साधी बायपास बस लवकर लागत नसल्याने, प्रवाशांना ताटकळत उभे राहण्याशिवाय पर्याय नसतो. पूर्वी अर्ध्या-अर्ध्या तासाला साधी बायपास बस लागायची. आता मात्र तास, दीडतास वाट पहावी लागते. एस.टी. महामंडळाने शिवशाही सोबतच साधी बसदेखील लावावी अशी मागणी प्रवाशांनी केलेली आहे.