लॉकडाऊन कालावधीत गावी जाणाऱ्यांना सशर्त मिळणार प्रवासी पास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2020 10:50 PM2020-05-01T22:50:33+5:302020-05-01T22:55:59+5:30
जिल्हाधिकारी संजय यादव यांची माहिती
धुळे : लॉकडाऊन कालावधीत धुळे जिल्ह्यातून आपल्या गावी जाण्यासाठी नागरिकांना सशर्त प्रवासी पास देण्यात येतील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी संजय यादव यांनी कळविले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ मार्च २०२० पासून संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित झालेला आहे. त्यानुसार नागरिकांना जेथे आहेत तेथेच थांबण्याचे निर्देश आहेत. मात्र, ३० एप्रिल रोजीच्या शासन अधिसूचनेनुसार आपल्या मूळ गावापासून इतर जिल्ह्यात/राज्यात अडकलेल्या स्थलांतरीत कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी, पर्यटक तसेच अन्य व्यक्तींना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी जिल्हादंडाधिकारी यांच्या स्तरावरुन प्रवासी पास देण्यात येणार आहेत. या पाससाठी करावयाचा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालया संकेतस्थळावर देण्यात आला आहे. या संकेतस्थळावर दिलेल्या लिंकद्वारे अर्जदार पाससाठी अर्ज करू शकतात. अर्ज भरताना पुढील सूचना, अटी व शर्तीस अधिन राहून भरणे आवश्यक आहे. त्या अशा : अर्ज भरताना त्यात ई- मेल आयडी अचूक नोंदवावा. व्हॉटसॲप असलेला मोबाईल क्रमांक नोंदवावा. प्रवासासाठी वापरणार असलेल्या वाहनाचा क्रमांक नोंदवावा. प्रवासासाठी वाहन नसल्यास तसे नमूद करावे. ज्यांच्याकडे ई- मेल आयडी नाही, अशा अर्जदारांना संबंधित सरपंच, ग्रामसेवक, पोलिस यांच्यामार्फत जवळच्या महा- ई सेवा केंद्र येथे संपर्क साधत त्यांच्या माध्यमातून अर्ज भरावा. महा ई- सेवा केंद्र येथे केलेल्या अर्जदाराचा पास संबंधित महा ई सेवा केंद्राच्या ई- मेल आयडीवर प्राप्त होईल. धुळे जिल्ह्यातून ज्यांना महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात जावयाचे आहे त्यांनीच येथे अर्ज करावेत. महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातून ज्यांना धुळे जिल्ह्यात यावयाचे आहे त्यांनी त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करावेत. अर्जदारांनी पुरविलेल्या माहितीच्या आधारे आपली माहिती आपण प्रवास करणाऱ्या संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात येईल. त्यांच्याकडून सकारात्मक अभिप्राय आल्यावर ई- मेल आयडीवर परवाना पाठविण्यात येईल. ज्यांना ई- मेल आयडी नाही त्यांनी महा ई- सेवा केंद्राच्या ई- मेलवरून परवाना प्राप्त करून घ्यावा. हा परवाना फक्त प्रवासी वाहनांसाठीच वैध राहील. अप्रवासी वाहनाचा वापर केल्यास मोटार वाहन तरतुदींतर्गत संबंधित शिक्षेस पात्र राहील.
प्रवास करणाऱ्या व्यक्तीस खोकला, ताप अशी कोणतीही लक्षणे नसावीत. प्रवास करणारी व्यक्ती कोणत्याही क्वांरटाइन क्षेत्रातील रहिवासी नसावी किंवा कोरोना विषाणूबाधित रुग्णाच्या संपर्कातील नसावी. पाससमवेत आधार कार्ड, मतदान कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, बँकेचे पासबुक, छायाचित्रासह ओळखपत्र असणे आवश्यक आहे. अशा प्रकारचा परवाना कोणाला सापडल्यास तो त्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे येथे जमा करावा. या पासचा गैरवापर केल्यास किंवा खोटी माहिती पुरवून पास मिळविल्यास अर्जदार व परवानाधारकाविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, भारतीय दंडविधान संहितेच्या तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहतील. हा परवानाचे हॉटस्पॉट क्षेत्र वगळता परवानाधारकाने मागणी केलेल्या जिल्ह्यात त्याच्या गावी जाण्यास वैध राहील. हेल्पलाइन क्रमांक असे : किशोर घोडके, खनिकर्म अधिकारी- 94051- 97840 (नाशिक विभाग, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार, नाशिक). संजय बोरसे, समन्वयक, वनहक्क- 94234- 93391 (अमरावती विभाग, अमरावती, वाशीम, अकोला, बुलडाणा, यवतमाळ). आशिष् वांढरे, टेक्निकल इंजिनिअर, 9730519238 (नागपूर विभाग, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली). भूषण पाटील- 94036- 38737 (पुणे विभाग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर), चंद्रकांत शेळके (मराठवाडा विभाग, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी, उस्मानाबाद, हिंगोली)