डोंगरावरील वृक्षांना वेस्ट बॉटलद्वारे ठिंबक सिंचन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 12:16 PM2019-04-02T12:16:20+5:302019-04-02T12:16:58+5:30
पिंपळनेर : वृक्षप्रेमी संघ व डॉक्टर्स असोसिएशनचा आगळा-वेगळा उपक्रम
पिंपळनेर : पाणी प्यायल्यानंतर ज्या प्लॅस्टीकच्या बाटल्या फेकून देण्यात येतात. त्या वेस्ट बॉटलद्वारे डोंगरावरील वृक्षांना ठिबक सिंचन करण्याचा उपक्रम पिंपळनेर येथील वृक्षप्रेमी व डॉक्टर असोसिएशनच्या वतीने करण्यात आला.
लाटीपाडा धरणाजवळील डोंगरावर वृक्षप्रेमी व डॉक्टर असोसिएशनने गेल्यावर्षी सुमारे १ हजार वृक्षांची लागवड करुन लोकसहभागातून धरणातून पाणी घेत ठिबक सिंचन केले होते. यामुळे येथे विविध रोपे जगली. मात्र, यावर्षी ठिबक सिंचन करणारी पाईपलाईन फुटल्याने या रोपांना पाणी देता येत नव्हते. यामुळे वृक्षांना याची झळ पोहोचू लागली होती. यामुळे वेस्ट बॉटल गोळा करुन त्यात पाणी भरण्यात आले. बाटलीच्या झाकणाला छिद्र करुन सुतळीची वात टाकण्यात आली. ही बॉटल प्रत्येक वृक्षाच्या मुळाशी ठेवण्यात आली. यामुळे वृक्षांना काही प्रमाणात का होईना पाणी मिळत आहे.
या उपक्रमासाठी डॉ.जितेश चौरे, डॉ.योगिता चौरे, डॉ.कैलास पगारे, डॉ.गिरीश जैन, डॉ.निलेश भामरे, डॉ.सत्यजित सोनजे, डॉ.मोहने, देसले, वृक्षप्रेमी संघटनेचे जी.व्ही. भामरे, बंटी खरोटे, प्रा.गणेश नेरकर, किरण भामरे, प्रा.हर्षल गवळे, सुभाष जगताप, प्रशांत कोठावदे, एस.जी. भामरे आदींनी परिश्रम घेतले.