आरोग्यासह स्वच्छतेकडे लक्ष द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 10:34 PM2018-12-14T22:34:29+5:302018-12-14T22:34:55+5:30
आरोग्य शिबिर : उद्घाटनप्रसंगी नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांचे प्रतिपादन
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : शहरातील रहिवाशांनी आरोग्यासह स्वच्छतेकडे नीट लक्ष द्यायला हवे़ सर्वांची दृष्टी चांगली राहिली तर सर्वदृष्टीने कार्यक्षम राहणार. तसेच स्वच्छता अभियानातील उत्कृष्ट सहभागासाठी सर्वांनी आपले शहर स्वच्छ, सुंदर व नीटनेटके राहील यासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्षा जयश्रीबेन अमरिशभाई पटेल यांनी केले.
येथील इंद्रसिंग भाऊसाहेब राजपूत हॉलमध्ये आर.सी.पटेल मेडिकल फाऊंडेशन, तालुका युवक काँग्रेस व शंकरा आय हॉस्पीटल यांच्या वतीने ८१वे आरोग्य शिबिर तसेच विकास योजना आपल्या दारी अभियानचे उद्घाटन लोकनियुक्त नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांच्या हस्ते करण्यात आले.
उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल म्हणाले की, गरजूंसाठी व सर्वांसाठी कृत्रिम हातपाय बनविण्यासाठी लवकरच शिबिराचे आयोजन करीत आहोत, याचा लाभ घेवून आपले जीवन आनंददायी व्यतीत करावे. आरोग्याची कोणतीही तक्रार राहू देणार नाही, यासाठी मुंबईच्या नामांकित हॉस्पीटलशी संपर्क केला आहे. लवकरच सुसज्ज व अत्याधुनिक हॉस्पीटलचे निर्माण करायचे आहे. विकास योजना अभियानाचाही लाभ सर्व गोरगरीब, गरजूंनी घ्यावा.
यावेळी नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, प्रियदर्शिनी सूतगिरणी चेअरमन भूपेशभाई पटेल, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सुभाष कुलकर्णी, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रभाकर चव्हाण, काँग्रेस शहराध्यक्ष नितीन गिरासे, बाजार समिती सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, माजी उपनगराध्यक्ष सुरेश बागुल, माजी नगरसेवक नाटुसिंग गिरासे, नेतेंद्र राजपूत, माजी नगराध्यक्षा संगिता देवरे, जि.प.सदस्या कल्पना राजपूत, नगरसेविका रंजनाताई सोनवणे, हेमलता गवळी, मल्हारराव चव्हाण, सभापती राजेंद्र अग्रवाल, मांडळचे भटू माळी, नगरसेवक हर्षल गिरासे, देवेंद्र राजपूत, अमोल पाटील, गणेश सावळे, चंद्रकांत कोळी, राजेंद्र पाटील, रावसाहेब पाटील, सुरेश अहिरे, विनोद पाटील आदी उपस्थित होते.
या शिबिरात ३२८ जणांची डोळे तपासणी करण्यात आली. ५० जणांवर मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येईल. अनेक जणांना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहेत. प्रास्ताविक जयवंत पाडवी, सुत्रसंचालन के.आर. जोशी तर आभार बी.एन. अहिरे यांनी मानले.