धुळे मनपातील २३ गैरहजर कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 12:41 PM2017-12-06T12:41:47+5:302017-12-06T12:50:16+5:30
धुळे महानगरपालिकेत सातत्याने कारवाईनंतरही परिस्थिती ‘जैसे थे’
आॅनलाईन लोकमत
धुळे, दि.६ : महापालिकेत आयुक्तांच्या आदेशाने मंगळवारी सकाळी १० वाजता अधिकारी, कर्मचाऱ्यांची हजेरी अचानक तपासण्यात आली़ या तपासणीत २३ कर्मचारी अनुपस्थित आढळल्याने त्यांना प्रत्येकी १०० रुपये दंड करण्यात आला आहे़
महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी यासाठी अधूनमधून त्यांची हजेरी तपासली जाते़ मात्र प्रभावी कारवाई होत नसल्याने परिस्थिती बदलत नाही़ दरम्यान, मनपा कर्मचाऱ्यांची हजेरी मंगळवारी अचानक तपासण्यात आली़ सकाळी १० वाजता आयुक्तांच्या आदेशाने प्रभारी बांधकाम अधीक्षक कैलास लहामगे यांनी सर्व विभागात जाऊन हजेरीपुस्तक तपासले़ या वेळी जे कर्मचारी गैरहजर होते, त्यांच्या नावांची नोंद घेण्यात आली़ एकूण २३ कर्मचारी उपस्थित नसल्याचे दिसून आले़ त्यानंतर लागलीच संबंधित कर्मचाऱ्यांच्या नावांची यादी आयुक्तांना सादर करण्यात आली़ आयुक्तांनी गैरहजर कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १०० रुपये दंड आकारण्याचे आदेश दिले़ आतापर्यंत पाच ते सहा वेळा हजेरीपुस्तक तपासण्यात आले असून किरकोळ दंड करण्यात आल्याने परिस्थिती ‘जैसे थे’ आहे़