प्रलंबित मागण्यांसाठी प्राथमिक शिक्षकांचा धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 04:02 PM2017-11-04T16:02:33+5:302017-11-04T16:04:20+5:30
महिलांची लक्षणीय उपस्थिती, विविध घोषणांनी शहर दणाणले उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांना मागण्यांचे निवेदन दिले,
आॅनलाईन लोकमत
धुळे : नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या सर्व शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करा, वेतनश्रेणीबाबत काढण्यात आलेला अध्यादेश रद्द करण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चात जिल्ह्यातील जवळपास दीड हजार शिक्षक सहभागी होऊन त्यांनी शासनाविरूद्ध एकजूट दाखवून दिली. तब्बल दोन तास हा मोर्चा सुरू होता.
राज्यातील प्राथमिक शिक्षक, शिक्षण व विद्यार्थी यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्या संदर्भात संघटनांनी शासनाशी अनेकवेळा पत्रव्यवहार करून, तसेच समक्ष चर्चा करूनही त्यावर कोणताच निर्णय झालेला नाही. यापूर्वीही संघटनांमार्फत अनेकवेळा धरणे आंदोलने, मोर्चे व इतर आंदोलने करूनही योग्य ती कार्यवाही न झाल्याने, आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांनी आज मोर्चाचे नियोजन केले होते. यात जिल्ह्यातील सर्वच शिक्षक संघटना सहभागी झालेल्या होत्या.
दुपारी १२.२० वाजता कामगार भवन येथून मोर्चाला सुरवात झाली. मोर्चाच्या अग्रभागी बॅनर धरलेले शिक्षक होते. त्यापाठोपाठ शिक्षिका होत्या.दोन रांगेत हा मोर्चा शिस्तित निघाला.
मोर्चा शिवतिर्थ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, जेल रोड, कमलाबाई चौक मार्गे दुपारी १.५० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
मोर्चा पोहचण्यापूर्वी पाच मिनीटे अगोदरच पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार बंद केले होते. त्यामुळे मोर्चा प्रवेशद्वाराजवळ अडविण्यात आला.
उपजिल्हाधिकाºयांनी स्वीकारले निवेदन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात येणारे निवेदन भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांनी स्वीकारले. शिक्षकांनी आपल्या मागण्या त्यांच्यासमोर कथन केल्या. आपले निवेदन शासनापर्यंत पोहचविण्यात येईल असे आश्वासन उपजिल्हाधिकारी भारदे यांनी शिष्टमंडळाला दिले.
यावेळी प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील, पदवीधर रवींद्र उत्तम खैरनार, गमन साहेबराव पाटील,देवीदास दौलत महाले, राजेंद्र गंगाधर जाधव, प्रमोद लक्ष्मण पाटील, अकील अन्सारी, मिलिंद सुभाष वसावे, उमराव साहेबराव बोरसे शिवानंद बैसाणे, मनोहर यादवराव सोनवणे, शरद माधवराव सूर्यवंशी,भगवंत नामदेव बोरसे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.