मजुरांची वैद्यकीय तपासणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 10:17 PM2020-04-13T22:17:46+5:302020-04-13T22:18:10+5:30
मंजुळा गावीत : गावापर्यंत सोडण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळनेर : ऊसतोडणी मजूरांना कारखानदार स्त्यावरच सोडून देत असल्याने घरी पायी येत आहेत़ गुजरात राज्यातून येणाऱ्या स्थलांतरीत मजुरांची संख्या आजही कायम आहे़ यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची भिती आहे़ त्यामुळे राज्यसिमा पुर्णपणे सील करावी़ मजुरांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना त्यांच्या गावापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना आमदार मंजुळा गावीत यांनी प्रशासनाला केल्या़
आमदार मंजुळा गावित यांच्या उपस्थितीत तहसीलदार प्रवीण चव्हाणके, डीवायएसपी श्रीकांत घुमरे, बीडीओ सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक डी़ के़ ढुमने, डॉ. तुळशीराम गावित यांच्या उपस्थितीत तहसिल कार्यालयात बैठक झाली़
गुजरात राज्यातून सध्या ऊसतोडीसाठी गेलेले कामगार परत येत आहेत़ तालुक्यातील मजूर असल्याने ते येतीलच़ आठ ते १० हजार मजूर १००, ५० च्या संख्येने येऊ लागले आहेत़ कारखानदार त्यांना राज्य सिमेपर्यंत सोडत आहेत़ तेथून हे मजूर पायी आपल्या गावाकडे येत असताना गावातील जाणकार मंडळी त्यांना गावात येऊ देत नाही़ अशा ऊसतोड मजुरांना सिमेवर अडवून त्यांची तेथे तपासणी करून त्याच वाहनाने त्यांना त्यांच्या गावी सोडण्याची व्यवस्था करावी़ चेकपोस्टवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना यासंदर्भात सूचना द्याव्यात, पोलीस कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याच्या तक्रारी येत आहेत, तर इतरत्र कुठेही वाहनाला जिल्ह्यात प्रवेश देऊ नये, अशांवर कारवाई करावी, भाजीविक्रेत्या वाहनांना परवाना द्यावा, तसेच त्यावर सॅनिटायझर करण्याच्या सूचना द्याव्यात, असंख्य मेंढपाळ मजुरांना गावात येऊ देत नसल्याने त्यांच्या पर्यंत अन्नधान्य पोचवण्याची व्यवस्था करावी, तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांना सॅनिटायझर, मास्क, पीपीटी किट्स उपलब्ध करून द्यावे, साक्रीत सील केलेल्या तीन किलोमीटर परिसरातील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करून घ्यावी, अत्यावश्यक सुविधा याठिकाणी कशा पोचतील याचे नियोजन त्वरित करावे़ कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना कुणीही उपाशी राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या़