धुळे मनपातील ‘सपा’च्या नगरसेविकेचा स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 05:14 PM2018-02-07T17:14:02+5:302018-02-07T17:15:34+5:30
महापौरांना दिले पत्र, सभापती निवडणुकीत भाजपाला केली होती मदत
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडणूकीत भाजपच्या उमेदवारास मतदान करून बंडखोरी करणाºया समाजवादी पार्टीच्या नगरसेविका फातमा शेख यांनी बुधवारी स्थायी समिती सदस्य पदाचा राजीनामा महापौर कल्पना महाले यांच्याकडे सादर केला़ पक्षाचे आदेश असल्याने राजीनामा देत असल्याचे त्या म्हणाल्या़
महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी १९ जानेवारीला निवडणूक प्रक्रिया पार पडली होती़ या निवडणूकीच्या पुर्वसंध्येलाच समाजवादी पक्षाच्या नगरसेविका फातमा शेख या भाजपच्या गोटात सामील झाल्या होत्या़ दरम्यान, ‘लोकमत’ने त्याबाबतचे वृत्त प्रसिध्द केले होते़ स्थायी समिती सभापती निवडीच्या दिवशी संबंधित नगरसेविका मनपात दाखल होताच समाजवादी पक्षाच्या पदाधिकाºयांनी त्यांच्या वाहनाला घेराव घालत त्यांना सभापती पदासाठी मतदान करण्यास रोखण्याचा प्रयत्न केला होता़ त्यामुळे पोलीसांनी अखेर सौम्य लाठीचार्ज करीत नगरसेविकेला सभागृहात नेले होते़ फातमा शेख यांनी सभापती निवडणूकीत भाजपच्या नगरसेविका वालीबेन मंडोरे यांना मतदान करून बंडखोरी केली होती़ त्यानंतर समाजवादी पार्टीने त्यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचेही स्पष्ट केले होते़ मात्र, बुधवारी फातमा शेख यांनी अचानक स्थायी समिती सदस्य पदाचा राजीनामा महापौर कल्पना महाले यांना सादर केला़ यावेळी सपाच्या मुलायमसिंह युथ बिग्रेडचे प्रदेश महासचिव गोरख शर्मा, जिल्हाध्यक्ष अकील अन्सारी, नगरसेवक अमीन पटेल, इनाम सिद्दीकी, नवाब खान, गुलाम कुरैशी उपस्थित होते़
स्थायी समितीत सभापतींसह एकूण १६ सदस्य आहेत़ त्यामधून फातमा शेख यांनी राजीनामा दिल्याने स्थायी समितीत एक पद रिक्त झाले असून त्या जागी महासभेत नवीन सदस्याची निवड केली जाईल, असे महापौर कल्पना महाले यांनी स्पष्ट केले़