धुळे महापालिकेत स्थायी आणि महिला बालकल्याण समिती सदस्यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 04:05 PM2017-12-28T16:05:17+5:302017-12-28T16:53:53+5:30
विशेष महासभा : २७ नगरसेवकांची सभेकडे पाठ
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : मनपा स्थायी समितीच्या आठ सदस्यांच्या निवडीसह महिला बालकल्याण समितीसाठी सर्व ११ सदस्यांची निवड गुरूवारी झालेल्या विशेष महासभेत करण्यात आली़ महापौर कल्पना महाले यांनी गटनेत्यांच्या शिफारशीनुसार नवीन सदस्यांची नावे जाहीर केली़ विशेष म्हणजे सदस्य निवडीच्या या महासभेला तब्बल २७ नगरसेवक अनुपस्थित होते़
मनपाच्या स्थायी समितीत १६ सदस्यांचा समावेश असून त्यापैकी निम्म्या अर्थात ८ सदस्यांचा कार्यकाळ १ जानेवारी २०१८ ला पूर्ण होत आहे़ तर महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ २२ जानेवारीला संपणार असल्याने समितीची फेररचना करण्यासाठी गुरूवारी विशेष महासभा झाली़ यावेळी महापौर कल्पना महाले, आयुक्त सुधाकर देशमुख, उपमहापौर उमेर अन्सारी, नगरसचिव मनोज वाघ व सदस्य, अधिकारी उपस्थित होते़ राष्ट्रवादीचे गटनेते कमलेश देवरे, शिवसेनेचे गटनेते संजय गुजराथी, काँग्रेसच्या गटनेत्या मोमीन आतिया बानो आणि शहर विकास आघाडीच्या गटनेत्या माधुरी अजळकर यांनी स्थायी व महिला बालकल्याण समितीसाठी निवडलेल्या सदस्यांची यादी बंद पाकिटात नगरसचिवांकडे सादर केली होती़ महापौरांच्या आदेशानुसार बंद पाकिटे उघडून महापौर कल्पना महाले यांनी प्रथम स्थायी समितीच्या व त्यानंतर महिला बालकल्याण समितीच्या सदस्यांची नावे जाहीर केली़ त्यानंतर नवनियुक्त सदस्यांचा महापौर, आयुक्त व सदस्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़
स्थायी समितीचे नवीन सदस्य
स्थायी समितीत राष्ट्रवादीतर्फे नलिनी वाडिले, कशीश उदासी, जितेंद्र शिरसाठ व जुलाहा नुरून्नीसा मकबुल अली यांची वर्णी लागली़ तर शहर विकास आघाडीतर्फे सुभाष खताळ, शेख फातमा शेख गुलाब यांची निवड झाली़ काँग्रेसतर्फे लिना करनकाळ यांना तर शिवसेनेतर्र्फे विश्वनाथ खरात यांना स्थायी समिती सदस्य पद देण्यात आले़
महिला बालकल्याण समितीच्या नवनियुक्त सदस्य
महिला व बालकल्याण समितीत राष्ट्रवादीतर्फे शशिकला नवले, नलिनी वाडिले, चंद्रकला जाधव, ललिता आघाव, जैबुन्नीसा पठाण व यमुनाबाई जाधव यांना, शहर विकास आघाडीतर्फे माधुरी अजळकर व चित्रा दुसाणे यांना, शिवसेनेतर्फे मुक्ता गवळी व हिराबाई ठाकरे यांना आणि काँग्रेसतर्फे मोमीन आतीयाबानो दोस्त महंमद यांना संधी देण्यात आली़ गेल्या वर्षी महिला बालकल्याण समितीतील सहा महिला सदस्यांची समितीवर फेरनिवड करण्यात आली होती, यंदा तशी संधी चंद्रकला जाधव, माधुरी अजळकर व मोमीन आतियाबानो दोस्त महंमद या तीन सदस्यांना मिळाली़ तर नलिनी वाडीले यांनी महिला बालकल्याण समिती सभापती पद आधी भुषविले आहे़ परंतु वाडीले यांना यंदा स्थायी समितीसह महिला बालकल्याण समितीतही स्थान मिळाले आहे़
२७ नगरसेवकांची सभेकडे पाठ
स्थायी समिती व महिला बालकल्याण समिती सदस्य निवडीसाठी झालेल्या विशेष महासभेकडे तब्बल २७ नगरसेवकांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले़ स्थायी समितीतून निवृत्त होत असलेले बहूतांश सदस्यही गैरहजर होते़