रात्री बॅग घेऊन पायी निघाला; ३५ हजारांचा गांजा सापडला
By देवेंद्र पाठक | Published: December 4, 2023 05:33 PM2023-12-04T17:33:38+5:302023-12-04T17:34:22+5:30
गांजासह ४५ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त; शिरपूर पोलिसांची कारवाई.
देवेंद्र पाठक,धुळे : येथील खंडेराव मंदिर जवळून रस्त्याने जात असलेल्या तरुणाला गांजासह पकडण्यात शिरपूर शहर पोलिसांच्या पथकाला यश आले. ही कारवाई रविवारी रात्री करण्यात आली. फैजानअली आबीद अली (वय २७, रा. आझादनगर, इंदूर, मध्य प्रदेश) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.
शिरपूर येथील खंडेराव मंदिर परिसरातून एक तरुण रात्रीच्या वेळी बॅगमध्ये गांजासदृश पदार्थ घेऊन जाणार असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक ए. एस. आगरकर यांना मिळाली. माहिती मिळताच खंडेराव मंदिर परिसरातील नाना-नानी पार्कजवळ पाेलिसांनी सापळा लावला. रविवारी रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास एक तरुण हातात बॅग घेऊन येताना दिसून आला.
त्याने त्याचे नाव फैजानअली आबीद अली सांगितले. त्याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांना संशय आल्याने त्याला ताब्यात घेऊन बॅगची तपासणी केली असता त्यात ३५ हजार १५० रुपयांचा गांजा, तसेच १० हजारांचा मोबाईल आणि २०० रुपये किमतीची बॅग असा एकूण ४५ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्या विरोधात गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापाऱ्यावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक ए. एस. आगरकर यांच्यासह पथकाने केली.