पिंपळनेर पोलिसांनी २३ गुन्हेगारांची घेतली ओळख परेड
By अतुल जोशी | Published: January 15, 2024 02:38 PM2024-01-15T14:38:50+5:302024-01-15T14:39:43+5:30
काहींना दिली कडक शब्दांत समज, काहींवर कारवाई प्रस्तावित.
अतुल जोशी, धुळे: भविष्यात होऊ घातलेल्या लोकसभा तसेच धार्मिक कार्यक्रम यांची पार्श्वभूमी लक्षात घेता पिंपळनेर पोलिस स्टेशन हद्दीतील २३ सराईत गुन्हेगारांची रविवारी ओळख परेड घेण्यात आली. त्यांना कडक शब्दांत समज देऊन चांगल्या वर्तनाची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. तर काही गुन्हेगारांवर वरिष्ठांच्या मागणीवरून कारवाई केली जाणार असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी सांगितले.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपळनेर पोलिस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगारांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशनानुसार कारवाई केली जात आहे. गुन्हेगारांवर यापूर्वी दोन किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे पोलिस ठाण्यात दाखल होते अशा गुन्हेगारांची पिंपळनेर पोलिस ठाण्यात ओळख परेड घेण्यात आली. ज्या गुन्हेगारांनी जातीय तेढ निर्माण करणे, चोरी करणे, शारीरिक नुकसान किंवा मालमत्तेचे नुकसान करणे, दरोडा टाकणे, दंगल करणे आदी गुन्हे केले आहेत अशा गुन्हेगारांवर वचक राहावा यासाठी पिंपळनेर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. पिंपळनेर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील तब्बल २३ गुन्हेगारांची रविवारी ओळख परेड घेण्यात आली. गुन्हेगारांची कानउघाडणी करून कारवाई करण्यात आली आहे. काही गुन्हेगारांवर कठोर कारवाईबाबत पोलिसांकडून वरिष्ठांना प्रस्ताव पाठवला जाणार आहे.