पिंपळनेर पोलीस स्टेशनचा दर्जा वाढवावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:45 AM2021-04-30T04:45:37+5:302021-04-30T04:45:37+5:30
पिंपळनेर : साक्री विधानसभा क्षेत्रातील पिंपळनेर येथे पोलीस स्टेशनचा दर्जा वाढवून पोलीस निरीक्षकाचे पद निर्माण करा, अशी ...
पिंपळनेर : साक्री विधानसभा क्षेत्रातील पिंपळनेर येथे पोलीस स्टेशनचा दर्जा वाढवून पोलीस निरीक्षकाचे पद निर्माण करा, अशी मागणी आमदार मंजुळा गावित यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांच्याकडे केली आहे. सामाजिक कार्यकर्ते संभाजी अहिरराव व जितेंद्र कुवर यांनी नाशिक येथे जाऊन डाॅ. दिघावकर यांना निवेदन दिले. अहवाल मागवून लवकरच हे काम मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले.
पिंपळनेर येथे पोलीस स्टेशन कार्यरत आहे. या पोलीस स्टेशनमध्ये एक ए.पी.आय., दोन पी.एस.आय. व हवालदार, नाईक, जमादार असे ४२ कर्मचारी कार्यरत आहेत. साक्री तालुका आदिवासीबहुल तालुका आहे. तसेच पिंपळनेर गाव राज्य महामार्ग क्र. ७ वर आहे. पिंपळनेरची बाजारपेठ मोठी आहे. येथे व्यापारीवर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. गावातून नंदुरबार, सुरत, नाशिक येथे सतत संपर्क होत असतो. भविष्यात होणाऱ्या तालुका निर्मितीमध्ये पिंपळनेरचे नाव अग्रस्थानी आहे. पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ७०-७२ ग्रुप ग्रामपंचायती असून, १५० पेक्षा जास्त गाव पाडे यांचा समावेश आहे .
वाढत्या चोऱ्या, वाढती गुंडगिरी, राजकीय मोर्चे, आंदोलने यासाठी सध्या कार्यरत असलेला पोलीस स्टेशनमधील कर्मचारी वर्ग अपुरा पडतो. पोलीस स्टेशनची दोन वाहने जुनी झाली असून, दुरुस्त करून देखील फारशी उपयोगात येत नाहीत. कर्मचारी आणि अधिकारी यांच्या राहण्यासाठी असलेल्या निवासस्थानांची अवस्था देखील फारशी चांगली नाही. वाढती गुन्हेगारी, अपघात रोखण्यासाठी पिंपळनेर पोलीस स्टेशनचा दर्जा वाढविणे अत्यंत गरजेचे झाले आहे.