पिंपळनेरला लाखोंची चोरी, ऐवज लांबविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 10:31 PM2020-08-25T22:31:18+5:302020-08-25T22:31:39+5:30
गुन्हा नोंद नाही : गावात चर्चेला उधाण
पिंपळनेर : येथील मुरलीधर मंदिर जवळ एका घरात अज्ञात चोरट्यांनी सोने व पैसे चोरुन नेल्याची घटना घडली आहे़ चोरट्याने नेमके काय चोरले आहे, कितीची चोरी झाली या संदर्भात सायंकाळी उशिरापर्यंत समजून आले नाही़ तर रात्री उशिरापर्यंत चोरीच्या गुन्ह्याची नोंद पिंपळनेर पोलीस ठाण्यात झालेली नव्हती़ सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज लोखंडी कोठीचे कुलूप तोडून रक्कम पसार केली असल्याचे बोलले जात आहे,
मात्र विशेष बाब म्हणजे याबाबतची फिर्याद पोलिसात देण्यास घरमालक तयार नसल्याची चर्चा दिवसभर सुरु होती़ येथील मुरलीधर मंदिर जवळ एका घराचे बांधकाम सुरू होते़ त्या अनुषंगाने रोख रक्कम घरात जमा केलेली होती़ तसेच ऋषिपंचमी हरतालिका असा महिलांचा सण उत्सव असल्याने मुली, सून व सासू यांनी आपले दागिने सणाला वापरून हे दागिने कोठीत पैशांसोबत ठेवले होते असे समजते. मंगळवारी सकाळी घरातील मंडळी झोपेतून उठल्यानंतर त्यांना कुलूप तुटलेले व लहान मुलांचा पैशाचा गल्ला बाहेर पडलेला दिसला़ कोठी डोकावून पाहिले असता दागिन्यांची पेटी व रोख रक्कम चोरीस गेल्याचे घरातील व्यक्तींनी पत्रकारांना सांगितले़ पण पोलिसात गुन्हा दाखल केलेला नाही़ दरम्यान, चोरट्याला बहुधा कोणाकडे कितीचा ऐवज आणि कुठे ठेवला असेल याची माहिती असावी, त्यातून त्याने हातसफाई केली असावी अशी शक्यता व्यक्त होत आहे़
पोलिसांकडे तपास केला असता सायंकाळी उशिरापर्यंत लेखी फिर्याद दाखल नसल्याने गुन्हा दाखल नसल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी ‘लोकमत’ला दिली़ चोरटा हा पाळीत ठेवणारा असावा अशी परिसरात चर्चा होती, चोरी होऊन देखील गुन्हा का दाखल केला नाही याचीच चर्चा मात्र दिवसभर पिंपळनेर गावात सुरु होती़