प्रार्थनास्थळे, स्मारके, मनपा दोन्ही इमारती जाहिरातीचे बॅनरसह फलकमुक्त होणार

By देवेंद्र पाठक | Published: March 8, 2024 04:29 PM2024-03-08T16:29:50+5:302024-03-08T16:31:02+5:30

महापालिकेकडून प्रतिबंधक क्षेत्र घोषित, सार्वजनिक ठिकाणी बॅनर लावल्यास परवानगी आवश्यक.

places of worship memorials municipal buildings will be free from advertising banners n dhule | प्रार्थनास्थळे, स्मारके, मनपा दोन्ही इमारती जाहिरातीचे बॅनरसह फलकमुक्त होणार

प्रार्थनास्थळे, स्मारके, मनपा दोन्ही इमारती जाहिरातीचे बॅनरसह फलकमुक्त होणार

देवेंद्र पाठक, धुळे : महापालिकेच्या क्षेत्रात शहरातील सार्वजनिक ठिकाणी विविध प्रकारचे जाहिरात फलक, बॅनर मोठ्या प्रमाणावर लावण्यात आलेले आहेत. मात्र हे फलक लावताना यातील बहुतांश फलक हे विनापरवानगी लावण्यात आल्याचे समोरआले आहे. परिणामी शहराचे विद्रुपीकरण दिवसेंदिवस वाढत आहे. याकरिता आता महापालिका प्रशासनाने शहरात फलक, बॅनर लावण्यासाठी प्रतिबंधित व बॅनर लावण्यासाठी क्षेत्र निश्चित केलेले आहेत.

शहरातील सर्वच भागात फलक, बॅनर हे लावलेले दिसून येत आहेत. यात मुख्य रस्त्यावर, तसेच चौकात बॅनर, फलक लावण्याचे प्रमाण वाढलेले आहे. शहरात वाहतुकीच्या रस्त्यावर चौकात देखील याचे प्रमाण अधिक आहे. तसेच आता दुभाजकावरही छोट्या आकाराच्या जाहिराती लावण्याचे प्रमाण वाढलेले आहे. वर्दळीच्या चौकात तर अक्षरश: बॅनरची गर्दी झाल्याचे चित्र आहे. या प्रकारे शहरातील चौक रस्त्यांवर लावण्यात आलेले फलक व बॅनरमुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. त्यातही हे फलक व बॅनर लावताना त्यासाठी घ्यावी लागणारी परवानगी महापालिकेकडे अनेकांकडून घेतली नसल्याचे स्पष्ट आहे. 

याकरिता महापालिका प्रशासनाने शहरात बॅनर, फलक लावण्यासाठी प्रतिबंधित व ना प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केलेले आहेत. तर महापालिका पथकाकडून अनधिकृत बॅनर, फलकावर कारवाईचे सत्र वेळोवेळी सुरू असते, आता तर कोणत्याही प्रकारचे बॅनर असो वा फलक त्याची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. अन्यथा, संबंधितांविरोधात वेळ आल्यास कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते.

बॅनर काढण्याची लवकरच मोहीम - शहरात लावण्यात आलेले फलक आणि बॅनर मध्ये बहुतांशी विनापरवानगी लावण्यात आलेले आहेत. तर महापालिकेच्या जाहीरात विभागाकडून सुमारे २१० जणांनी रीतसर परवानगी घेऊन बॅनर लावलेले असलेतरी त्याची मुदत संपली आहे. तरीही त्यांचे बॅनर दिमाखात उभे असल्याने ते काढण्याची मोहीम लवकरच हाती घेतली जाणार आहे. याशिवाय विनापरवानगी लावलेले बॅनर देखील काढले जातील.

प्रतिबंधित नसलेले क्षेत्र -  महापालिकेच्या जाहिरात विभागातून परवाना घेऊन जाहिरात फलक, बॅनर लावता येणार आहे. यात शहरातील २२ जागा, देवपूर भागातील ६ जागा, साक्री रोड भागात १३ जागा, पारोळा रोड भागात ६ जागा, स्वामी नारायण ते वडेल चौफुली, वीर सावरकर पुतळा ते नकाणे गावापर्यंतच्या भागात फलक लावता येणार आहे.

 जाहिरात प्रतिबंधक क्षेत्र - शहरात जाहिरात लावण्यासाठी क्षेत्र व प्रतिबंधक क्षेत्र ठरविण्यात आलेले आहेत. प्रतिबंधित क्षेत्रात मनपा नवीन प्रशासकीय इमारत, जुनी मनपा इमारत, शहरातील महापुरुषांचे स्मारक, शहर हद्दीत मंदिर, मशिद, गुरुद्वारा, चर्च व इतर धार्मिक स्थळे, कराचीवाला खुंट, बॉम्बे लाॅज चौक, कालिका माता मंदिर चौक, पांझरा नदी किनारी, जुने जिल्हा रुग्णालय, बाफना हायस्कूल चौक परिसरात १०० मीटर परिसरात लावण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.

थेट आता कारवाई करणार - शहरात आता बॅनर, फलक लावण्यासाठी क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. त्याप्रमाणे त्या क्षेत्रात हे फलक व बॅनर आता महापालिकेची पूर्व परवानगी घेऊन लावण्यात येणार आहे. जर प्रतिबंध क्षेत्रात कुणी बॅनर, फलक लावल्याचे आढळून आल्यास त्यावर मालमत्ता विद्रुपीकरण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे दंडाचीदेखील तरतूद आहे.- अमिता दगडे पाटील, आयुक्त तथा प्रशासक, महापालिका, धुळे.

Web Title: places of worship memorials municipal buildings will be free from advertising banners n dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.